मुंबईत डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही, ‘जिनोम सिक्वेंसिंग’चा दुसरा अहवाल दिलासादायक

कोरोना विषाणूच्या विविध उपप्रकारांची तत्काळ माहिती मिळवण्यासाठी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात केलेल्या 374 नमुन्यांपैकी एकाही नमुन्यात अत्यंत घातक समजला जाणारा आणि वेगाने पसरणारा डेल्टा प्लस हा घातक कोरोना विषाणू आढळला नसल्याचे दुसऱ्या जिनोम सिक्वेंसिंगच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झाले असताना कोरोनाच्या डेल्टा तसेच इतर उपप्रकार सापडत असल्यामुळे खळबळ उडाली होती. 22 ऑगस्टला पहिल्या जिनोम सिक्वेंसिंग अहवालात 188 नमुन्यांपैकी तब्बल 128 डेल्टाचे रुग्ण सापडले होते तर आज जारी करण्यात आलेल्या 374 नमुन्यांपैकी 304 हे डेल्टाचे रुग्ण सापडले आहेत. मात्र त्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही. इतर नमुन्यांमध्ये ‘नाइन्टीन-ए’ उपप्रकारातील 2 आणि ‘ट्वेन्टी-ए’ उपप्रकारातील 4 नमुने आणि उर्वरित 66 नमुने हे सर्वसाधारण कोरोना विषाणूचे आहेत.

डेल्टा विषाणू अतिधोकादायक नाही

डेल्टा हा कोरोनासारखा सर्वसाधारण विषाणू आहे. तो डेल्टा प्लससारखा अतिधोकादायक नाही किंवा वेगाने पसरत नाही. त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही. मात्र धोका टळला नसून मुंबईकरांनी मास्क लावणे, हातांची स्वच्छता ठेवणे आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळून सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या