टँकर्सच्या मागणीत वाढ, लॉबी रडारवर

21

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला असतानाही पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आजमितीला टँकर्सची संख्या २३१ वर पोचली आहे. सध्या सुरू असलेल्या गावात खरेच टँकरची गरज आहे का? तसेच या गावची पाण्याबाबतची सद्य:स्थिती तपासण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार उपविभागीय अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. हे पथक सखोल तपासणी करून आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेमुळे टँकर लॉबी जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर आली आहे, असेच यातून स्पष्ट होते. जिल्ह्यात समाधानकारण पाऊस झाल्यानंतरही टँकर्सची संख्या वाढत असल्याने त्याची गरज तपासणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, फुलंब्री तालुक्यातील टँकर तपासणीसाठी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, सिल्लोडसाठी श्रीमंत हारकर, गंगापूर तालुक्यासाठी भाऊसाहेब जाधव तर रत्नपूर तालुक्यात सुरू असलेल्या टँकर तपासणीसाठी वैजापूरचे उपविभागीय अधिकारी संदिपान सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या पथकाने टँकर मंजूर असलेल्या गावांची लोकसंख्या, तेथील पाणीपुरवठ्याची उपलब्धता साधने व स्थिती, त्याद्वारे रोज होणारा पाणीपुरवठा, टंचाईग्रस्त गावांमध्ये सध्या उपलब्ध असलेला इतर स्त्रोतापासून पाणी मिळत असल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा गरजेचा आहे काय तसेच पेयजल, टंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांमध्ये पाणीपुरवठा करण्याव्यतिरिक्त अन्य उपाययोजना घेणे शक्य आहे काय? याबाबत हे पथक गावनिहाय स्थळपाहणी तपासणी अहवाल तसेच टँकर सुरू ठेवणे आवश्यक आहे काय? यासंबंधीचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जलयुक्त गावांमध्येही टँकरफेऱ्या!
संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियानाचे काम जोरात सुरू आहे. या योजनेवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. टँकरमुक्त गाव करण्याच्या उद्देशाने हा निधी खर्च करण्यात आला आहे, तरीही दोन्ही वर्षामध्ये जलयुक्त झालेल्या गावांमध्ये प्रशासनाला टँकर पाणीपुरवठा करावा लागत आहे.

२०१५-१६ या वर्षामध्ये जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या २२८ गावांत जलयुक्त शिवार अभियानाची कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले, मात्र यापैकी गेल्यावर्षी ५५ तर यंदा तब्बल ४३ गावांमध्ये आजही टँकर्सने पाणीपुरवठा करावा लागत आहे. टँकरवाड्याची उपाधी यामुळे दूर होताना दिसत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या