मलईदार खुर्चीला चिकटलेल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करा!

19

सामना ऑनलाईन । मुंबई

इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ अर्थात रिपेअर बोर्डातील अनेक अधिकारी ‘मलईदार’ खुर्च्या अडवून बसले आहेत. बेकायदा रूम अलॉटमेंट करून लाखोंचा मलिदा खाणाऱ्या या अधिकाऱ्यांविरोधात विधानसभेतही आवाज उठवण्यात आला होता. या अधिकाऱ्यांना हटवून बोर्डात ‘स्वच्छता’ अभियान कधी राबवणार, असा सवाल शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. कुणाच्या आशीर्वादाने हे अधिकारी खुर्चीवर वर्षानुवर्षे बसले आहेत, असेही राऊत यांनी विचारले आहे.

रिपेअर बोर्डातील इस्टेट मॅनेजर आणि असिस्टंट पदावरील किशोर जगताप या अधिकाऱ्याविरोधात सर्वाधिक तक्रारी आहेत. जगताप आणि दलाल यांच्या संगनमताने विक्रोळीच्या कन्नमवार नगरातील संक्रमण शिबिरातील रिक्त गाळय़ांचे वितरण करण्यात आले होते. त्यासाठी बनावट कागदपत्रेही तयार करण्यात आली होती. यासंदर्भात जगताप यांच्या संपत्तीची व या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुनील राऊत यांनी विधानसभा अधिवेशनात (12 डिसेंबर 2017) केली होती. राऊत यांनी हा तारांकित प्रश्न (क्र. 95796) उपस्थित केला होता.

रिपेअर बोर्डातील हे मलईदार खुर्चीचे प्रकरण अतिशय गंभीर असून वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची येथून तत्काळ बदली करावी आणि त्यांच्या कार्यकाळातील सर्व प्रकरणांची, त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुनील राऊत यांनी केली आहे.

 

अनिरुद्ध आबेगावकरांचे काय ?

अनिरुद्ध आबेगावकर हे वरिष्ठ लिपिकही येथे असेच चिकटलेले आहेत. जून 2018 च्या पहिल्या आठवडय़ात उपाध्यक्ष म्हैसकर यांनी त्यांची बदली कोकण म्हाडामध्ये केली. तीन वेळा स्टॅण्ड रिलीव्ह ऑर्डरही निघाली, मात्र पुनर्रचित गाळे विभागातून बदली होऊ नये म्हणून यासाठी आटापिटा करणारे आबेगावकर चक्क तीन महिने विनापगार काम करीत आहेत. आता ते ‘कसले’ काम करीत आहेत याचाही शोध घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

किशोर जगताप यांचा कारनामा

जगताप यांना वरिष्ठांचे आशीर्वाद आहे हे निश्चित आहे. कारण गेली सात वर्षे ते बोर्डातच आहेत. त्यांनी कन्नमवार नगरात नव्हे तर मुलुंड गव्हाणपाडा येथील 30 ते 35 खोल्याही खोटी कागदपत्रे सादर करून वितरित केल्याची चर्चा आहे. सरकारी अधिकाऱ्याची दर तीन वर्षांनी बदली करावी असा नियम असतानाही जगताप एकाच खुर्चीत सात वर्षे ठाण मांडून कसे बसले आहेत, असा सवाल आता विचारण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या