कर्नाटकाप्रमाणे लिंगायत समाजास स्वतंत्र धर्म मान्यता द्या!

49

सामना प्रतिनिधी । नांदेड

लिंगायत समाजास संवैधानिक धर्म मान्यता व राष्ट्रीयस्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी आज महात्मा बसवेश्वर पुतळा कृती समितीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कर्नाटकाप्रमाणेच महाराष्ट्रातही लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्माचा दर्जा देवून त्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात म्हंटले आहे की, लिंगायतची जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सर्व धार्मिक संस्कार, आचरण पध्दती, धर्मग्रंथ तसेच उपलब्ध शासकीय गॅझेट इंग्रजीकालीन पुराव्यात असलेली स्वतंत्र धर्म म्हणून नोंद, समवेत सर्व असलेले पुरावे यानुसार लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म आहे. याबाबी समोर ठेवून कर्नाटक राज्य सरकारने राममोहनदास यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र नॉन लिंगायत समिती नेमून अभ्यास केला. त्याचा अहवाल सरकारने आल्यानंतर कर्नाटक सरकारने लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्माचा दर्जा देवून राष्ट्रीयस्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. महाराष्ट्रात सुध्दा लिंगायत समाज मोठ्या संख्येने असून, उपरोक्त मागणीसाठी नांदेड, लातूर, सांगली, कोल्हापूर, यवतमाळ याठिकाणी लाखोंच्या संख्येने समाजाचे मोर्चे निघाले आहेत. मात्र राज्य शासनाने त्याची गंभीर दखल घेतलेली नाही. २०१४ च्या भाजपाच्या जाहीरनाम्यात लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्म मान्यतेची मागणी प्रामुख्याने होती, याचाही उल्लेख या निवेदनात केला आहे.

या मागणीबाबत सकारात्मक विचार करावा अन्यथा हा शांतताप्रिय समाज येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत याबाबीचा गांभिर्याने विचार करेल, लिंगायत समाजाची न्याय हक्काची मागणी महाराष्ट्र सरकारने पूर्ण करुन याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी केली आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे, नागनाथ स्वामी, साखरे, दत्ता शेंबाळे, तातेराव वाकोडे पाटील, गिरीश नारखेडे, केशव खिचडे, पिंटू बोंबले, रत्नाकर कुऱ्हाडे, डॉ.व्यंकट कुऱ्हाडे, राजू बोंबले, नंदू येरगे, विशाल लकडे, गजानन बामणे, श्रावण कुंटूरकर, प्रणव कुऱ्हाडे, माधव मोरे, सुरज शेट्ये आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या