सेतू कार्यालय सुरू करण्यासाठी ठिय्या आंदोलन

सामना प्रतिनिधी, मनमाड

तहसीलदारांनी सेतू कार्यालय अचानक बंद केल्याने महत्त्वाच्या कामांसाठी मनमाडकरांना नांदगावला पायपीट करावी लागत आहे. याकरिता हे सेतू कार्यालय त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी मनमाडकरांनी मंडल अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. मनमाड बचाव समितीने या आंदोलनात सहभागी होत विविध समस्यांबाबत लक्ष वेधले.

सेतू कार्यालय तत्काळ पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी मनमाड बचाव जन आंदोलन सतितीतर्फे येथील मंडल अधिकारी कार्यालय ठिय्या आंदोलन करण्यात आले. हे नाशिक जिल्ह्यातील क्र.३ चे दीड लाख लोकसंख्या असलेले मध्यवर्ती शहर असूनही शासनाकडून तसेच प्रशासनाकडून या शहरावर वारंवार अन्याय होत आहे. शहरातील अनेक महत्त्वाचे शासकीय कार्यालय इतरत्र हलविण्यात आली आहे. मनमाड तालुक्याची मागणी मंजूर असून शासनाच्या विचाराधीन आहे. तत्पूर्वी अपर तहसील कार्यालय शहरात पुन्हा कार्यान्वीत होणे गरजेचे आहे. मात्र तहसीलदार यांनी शहरातील सेतू कार्यालय बंद करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे.

सेतू कार्यालय येथे जे ऑफिडेव्हीट ३३ रु. ६० पैसेमध्ये होते. तेच ऑफिडेव्हीट इतरही ई-सेवा केंद्रात नाकारले जाते. किंवा त्याकरिता ५० ते ६० रुपये आकारले जातात. मनमाड सेतू कार्यालय उत्पन्न दाखला, डेमासाईल, नॅशनॅलिटी, जात दाखला, इतर दाखले फक्त ८० रुपये आकारणीमध्ये बनवून मिळतात. तर याच दाखल्यासाठी ई-सेवा केंद्रात ५०० ते ७०० रुपयेपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. शासनाच्या प्रत्येक कामासाठी अर्जदारास घोषणापत्र अनिवार्य केलेले आहे. सदर घोषणापत्र कोणत्याही ई- सेवा केंद्रात होत नसल्याने शहरातील ज्येष्ठ नागरिक, विधवा पेन्शनधारक, दिव्यांग यांना प्रत्येक वेळेस नांदगाव येथे जाणे शक्य नाही.

मनमाडकरांच्या हिताचा निर्णय घेऊन मनमाड सेतू कार्यालय पुर्ववत सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी करत तीव्र घोषणा देत व निदर्शने करून कार्यकर्त्यांनी मंडळ अधिकारी कार्यालयात धरणे धरले. भीमराज लोखंडे, अध्यक्ष शेख कादरी, सचिव कैलास शिंदे, यशवंत बागुल, विष्णू चव्हाण, अशोक गांगुर्डे, शेख शकील, तौसिफ पठाण, जलिम शेख, सुरेश गांगुर्डे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. राजाभाऊ पारीक यांच्यासह अनेकांनी आंदोलनास पाठिंबा दिला.