मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव द्या ; 31 जुलैचा अल्टिमेटम

सामना ऑनलाईन । मुंबई

आमचा देश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, म्हणूनच आम्ही लोकसभा निवडणुकीत सहकार्याची भूमिका घेतली आहे, पण अन्याय कुठवर सहन करायचा? मुंबईचे आद्य शिल्पकार आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्यासाठी टाळाटाळ का? झारीतले कोण शुक्राचार्य आडवे येत आहेत, असा संतप्त सवाल दैवज्ञ समाजाने केला आहे. 31 जुलैच्या आत याबाबत निर्णय घ्या, अन्यथा विधानसभा निवडणुकीवर समाज कडकडीत बहिष्कार घालेल, असा इशाराही त्यांनी दिला.

रेल्वे दिनानिमित्त नाना चौक येथील नाना शंकरशेठ यांच्या पुतळय़ाला वंदन करण्यासाठी मुंबईतील नानाप्रेमी आणि दैवज्ञ समाज माजी नगरसेवक आणि नाना शंकरशेठ प्रतिष्ठानचे सरचिटणीस ऍड. मनमोहन चोणकर यांच्या पुढाकाराने एकवटला होता. यावेळी नाना शंकरशेठ यांचे खापरपणतू व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेठ, दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष दिनकर बायकेरीकर, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र माहीमकर यांच्यासह असंख्य दैवज्ञ समाजबांधव उपस्थित होते. यावेळी नानांचे स्मारक उभारण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल थोर पुरुषांनी व्यक्त केलेली खंत याबाबतचे फ्लेक्स उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

शिवसेनाप्रमुखांची इच्छा सरकार पूर्ण करणार काय?

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नाना शंकरशेठ यांच्याप्रति नितांत आदर होता. नानांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्याची मागणी शिवसेनाप्रमुखांनी केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नानांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यायलाच हवे असे सांगितले आहे. 31 जुलै रोजी नानांची पुण्यतिथी आहे. शिवसेनाप्रमुखांची इच्छा पूर्ण करून सरकार त्या दिवशी याबाबतची घोषणा करणार काय, असा सवाल नाना शंकरशेठ प्रतिष्ठानचे सरचिटणीस ऍड. मनमोहन चोणकर यांनी केला.