महाराष्ट्रात राणे पिता-पुत्रांसाठी गृहमंत्र्यांचा वेगळा कायदा लागू आहे का, असा सवाल करत पोलीस आणि पत्रकारांना धमकी देणाऱ्या या पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना निवेदन देण्यात आले.
पोलीस प्रशासन, लष्कर, शेतकरी हे या देशाचे महत्त्वाचे घटक आहेत. स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता राज्य, देश तसेच सर्वांच्या सुरक्षेसाठी सदैव कार्यरत असतात. त्यामुळे त्यांचा व त्यांच्या वर्दीचा प्रत्येक नागरिकांनी मानसन्मान हा ठेवलाच पाहिजे, हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिकवण आहे. पण सत्ताधारी सत्तेचा गैरफायदा घेऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटेल तशी वागणूक देत वर्दीचा अपमान करीत आहेत. शिवाय पत्रकारांचाही वारंवार अपमान होत असताना दिसत आहे. हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील पुतळा अक्षम्य दुर्लक्षामुळे व खाबुगिरीला सोकावलेल्या प्रशासनामुळे कोसळल्यानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या दौऱयावेळी राणे पिता-पुत्राने तेथे गुंडगिरीचा हैदोस घातला. पत्रकार व पोलिसांच्या अंगावर धावून जात मारण्याची धमकी दिली. यावर गृहमंत्र्यांनीही राणे पिता-पुत्रांची भाषा आक्रमकच असल्याचे सांगून, महाराष्ट्रात भाजप किंबहुना राणे पिता-पुत्रांना वेगळा कायदा लागू असल्याची जाणीव करून दिली. गृहमंत्र्यांच्या निक्रियतेमुळे हतबल बनलेल्या पोलीस दलाने स्वतःचे मनोधैर्य खच्चीकरण करून न घेता, पत्रकारितेलाही जाहीरपणे आव्हान देत, त्यांच्याशी अरेरावी करत पोलीस दलाशी आक्षेपार्ह वर्तन करणाऱया या राणे पिता-पुत्रांवर गुन्हे दाखल करून योग्य ती शिक्षा कायद्यान्वये द्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.