गांधी कुटुंबीयांना ‘एसपीजी’ सुरक्षा पुन्हा द्या, काँग्रेसची राज्यसभेत मागणी

277

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही गांधी कुटुंबीयांची ‘एसपीजी’ सुरक्षा काढल्यावरून बुधवारी गदारोळ झाला. काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी राज्यसभेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधी यांना ‘एसपीजी’ सुरक्षा पुन्हा देण्याची मागणी केली.

 मनमोहन सिंग यांच्यासह सोनिया गांधी, राहुल व प्रियांका गांधी यांची एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) सुरक्षा काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला. त्याऐवजी त्यांना सीआरपीएफची झेड सुरक्षा देण्यात आली आहे. याच मुद्दय़ावर शून्य प्रहरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार आनंद शर्मा यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. देशातील चार प्रमुख नेत्यांची एसपीजी सुरक्षा काढून सरकारने त्यांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मनमोहन सिंग हे दहा वर्षे देशाचे पंतप्रधान होते. सोनिया गांधी या इंदिरा गांधी यांच्या सून व राजीव गांधी यांच्या पत्नी आहेत. या दोघा माजी पंतप्रधानांची हत्या झाली आहे. त्यामुळे सरकारने या प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला हवी, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.

मागील दहा वर्षे यूपीए सरकारच्या काळात माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची एसपीजी सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड यूपीए सरकारने केली नव्हती ही बाबही शर्मा यांनी निदर्शनास आणून दिली. गांधी कुटुंबीयांची सुरक्षा हा कोणत्याही पक्षाचा राजकीय मुद्दा नसून एका व्यक्तीची सुरक्षेचा मुद्दा आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.

गांधी कुटुंबाच्या सुरक्षेतील बदल नियमानुसारच 

गांधी कुटुंबाच्या सुरक्षेतील बदल नियमानुसारच केले आहेत, असे काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्दय़ावर स्पष्टीकरण देताना भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सांगितले. श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेचा खात्मा झाल्यानंतर गांधी कुटुंबीयाच्या जिवाला धोका नसल्याची खात्री करूनच एसपीजी सुरक्षा काढण्यात आली आहे. हा निर्णय गृह मंत्रालयाने घेतल्याचेही ते म्हणाले. भाजपचे संसदीय कार्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी या निर्णयात कोणतेही राजकारण नसून केंद्रीय गृह मंत्रालयाने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेऊनच गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्यात आल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या