आध्यात्मिक लोकशाहीचे जनक

उमाकांत गोपछडे

आध्यात्मिक लोकशाहीचा विचार महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकात मांडला समाजात असलेली मरगळ दूर करण्यासाठी त्यांनी त्याकाळी सामाजिक क्रांतीची बीजे पेरली. अक्षय्य तृतीया म्हणजे या थोर समाजसुधारक बसवेश्वर यांची जयंती. त्यानिमित्त . बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारा लेख

सामाजिक समतेचा ध्यास मनाशी बाळगून, तत्त्वांशी,

विचारांशी एकरूप राहून, सामाजिक समतेचा झेंडा घेऊन धर्माचा खरा अर्थ आणि मार्ग सांगणाऱया महान विभूतींमध्ये महावीर दयानंद, राजा राममोहन रॉय, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद अशा भिन्न मतावलंबी आणि समाजसुधारकांचा समावेश होतो. या श्रेणीत थोर समाजसुधारक समतावादी महात्मा बसवेश्वरांचे स्थान महत्त्वाचे आहे.

श्रीमद्भगवद्गीतेत श्रीकृष्णाने म्हटले आहे की, धर्म विनाशाच्या मार्गाने जाऊ लागतो आणि विवेकहीन अंध विश्वासाची चलती होऊ लागते तेव्हा मी सत्याच्या उद्धारासाठी अवतार घेऊन त्याची प्रचीती हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानात आणि ऐतिहासिक दृष्टांतातून मिळते. वेगवेगळय़ा काळात असे सत्यशोधन करून धर्माचा खरा अर्थ सांगणाऱया महान विभूतीमध्ये महात्मा बसवेश्वरांचे स्थान आहे.

बसवेश्वरांनी ज्या धर्माचा उपदेश केला तो मूलतः सामाजिक स्वरूपाचा होता. त्यांनी आपल्या काळात ब्राह्मणवादाचा विरोध केला. तत्कालीन ब्राह्मण धर्म विशिष्ट योग्यतेची मागणी व भलावण करीत होता. बसवेश्वरांनी ईश्वरभक्तीचे महत्त्व आणि सर्व प्राणिमात्रांना प्रेमभावनांची उद्घोषणा केली.

संत बसवेश्वरांनी वैदिक धर्मातील जातीव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानीकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला. बसवेश्वरांनी घालून दिलेल्या मार्गाला लिंगायत धर्म या नावाने ओळखले जाते. सर्वधर्मसमभाव जोपासणाऱया बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सर्व कनिष्ठ व उच्च जातीतील लोकांना लिंगायत समाजात प्रवेश दिला. कर्नाटकातील विजापूर जिल्हय़ातील बागेवाडी येथे महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. ११०५ ते ११६७ बसवेश्वरांचा जीवनकाळ आहे. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीया हा त्यांचा जन्मदिवस आहे. नंदीचे रूप म्हणून त्यांचे नाव वृषभ ठेवण्यात आले नंतर बसव व बसवेश्वर असे नामकरण झाले. बसवेश्वरांनी आठव्या वर्षी उपनयन (मुंज) करण्याचे नाकारले. घराचा त्याग केला, कुंडल संगम येथे जाऊन ते जातवेद मुनीकडे राहू लागले. कर्नाटकात कृष्ण व मलप्रभा नद्यांच्या संगमवर हे शिव मंदिर होते. संगमेश्वरावर बसवेश्वरांची श्रद्धा होती. येथेच त्यांनी जातवेद मुनीकडून लिंगायत समाजाची दीक्षा घेतली. येथे वेद अभ्यास अनेक धार्मिक ग्रंथाचे अध्ययन, चिंतन, मनन बसवेश्वरांनी केले. तत्कालीन समाजातील लोकांचे कर्मकांड व अंधविश्वास पाहून त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देईना. ते वैदिक परंपराविरोधी होते.

आध्यात्मिक लोकशाहीचा विचार महात्मा बसवेश्वरांनी १२व्या शतकात मांडला व समाजात असलेली मरगळ दूर करण्यासाठी त्यांनी त्याकाळी सामाजिक क्रांतीची बीजे पेरली. लिंगायत समाजाबरोबर हिंदू धर्मातील इतर जातीच्या लोकांनादेखील अहिंसेच्या मार्गावर आणण्यासाठी स्त्र्ााr-पुरुषांना समान हक्काची शिकवण महात्मा बसवेश्वरांनी दिली. जातीयवाद त्यांना कदापि मान्य नव्हता. स्त्रीयांनादेखील समान हक्क मिळावा यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांनी सनातन धर्मातील सर्व प्रतिबंधित शास्त्र्ाविधींना तिलांजली दिली. पुरोहितांचे वर्चस्व व त्यांच्या सिद्धांतापासून सर्वसामान्य                 स्त्री-पुरुषांना त्यांनी मुक्ती मिळवून दिली. उच्च-नीचतेच्या कल्पनांना मूठमाती देऊन आपल्या अनुयायात समानतेची भावना दृढमूल केली. त्यांनी महिला वर्गाच्या मदतीसाठी संघर्ष केला. दलित व मागासवर्गीय लोकांबरोबर उच्चवर्णीयांप्रमाणे समानतापूर्वक व्यवहार केला. बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा सामाजिक समता होता.

महात्मा बसवेश्वरांनी संस्कृत भाषेतील सुरक्षित ज्ञानाच्या एकाधिकाराला आव्हान दिले व ते तोडले. आपल्या विचारांना सामान्यांच्या घरापर्यंत बोली भाषेत पोहोचविले.

उपनिषद काळातील हिंदू तत्त्वज्ञान आणि आचारविचारांच्या प्राचीन वैभवास बळ देण्याचे त्यांनी काम केले आणि म्हणूनच बसवेश्वरांना परमेश्वरांचे अवतार मानतात. महात्मा बुद्धांप्रमाणेच बसव संदेशात भक्तिपूर्ण प्रेम आणि विद्या समाविष्ट होती. त्यात स्त्री-पुरुषांना समान दृष्टीने पाहण्याचा उपदेश आहे. मानव मात्रात भेदभाव करण्यास अजिबात स्थान नाही. बसव काळातील सामाजिक आर्थिक सिद्धांत व धार्मिक चिंतनावर त्यांचा विचाराचा क्रांतिकारी प्रभाव पडलेला होता.

बसवेश्वरांनी सांगितले की, तुम्ही काम करण्यासाठी तयार व्हा, शेतात जा, एरव्ही फळे मिळणार नाहीत. बसव तत्त्वानुसार त्यांची शिकवण अशी जीवनयथार्थ आहे. जीवन सत्य आहे आणि समाधी हे त्याचे लक्षण नाही. त्यांनी सांगितले की, अनुयायांनी जीवनाची आव्हाने धैर्याने आणि दृढतेने, निर्धाराने पेलली पाहिजेत. त्यांचा हिमतीने मुकाबला केला पाहिजे, त्यांनी कायक या तत्त्वाचे महत्त्व समजावून सांगितले. श्रमाची प्रतिष्ठा सांगणारा हा क्रांतिकारी संदेश होय.

बसवेश्वरांनी समाज परिवर्तनासाठी आयुष्यभर कार्य केले. जे जे करणे शक्य होते ते ते त्यांनी केले. कशाची पर्वा न करता केवळ समाजहितासाठी त्यांनी कार्य केले. त्यापेक्षा आता आपल्या हातून काही कार्य होईल असे वाटत नाही. असे त्यांना वाटते आणि १९६७ साली म्हणजे वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांनी देह ठेवला ते शिवमय होऊन गेले. समाजाला योग्य वळण लावणारा महात्मा आजही क्रांतिकारक वाटतो. त्यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरतात.

(लेखक बिलोली पंचायत समितीचे माजी उपसभापती आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या