हिंदुस्थानातील नोटाबंदी आणि कॅशलेस अर्थक्रांती

80

<< पडसाद >> << मुजफ्फर हुसेन >>  [email protected]


साम्यवादी क्रांतीला १०० वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ जगभर साम्यवादाने जगाचे किती भले केले या विषयावर मोठी चर्चा सुरू असतानाच हिंदुस्थानात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक नोटाबंदी केली आणि कॅशलेस समाज उभारण्यासाठी अर्थक्रांतीची घोषणा केली. परंतु ही घोषणा करताना त्यांनी अर्थव्यवस्थेशी संबंध असलेल्या कोणत्याच संस्थेला, व्यवस्थेला किंवा व्यक्तींना विश्वासात घेतले नाही. त्यांची ही कृती एखाद्या सेनापतीने लष्कराला विश्वासात न घेता युध्दाची घोषणा केल्यासारखी आहे. त्यामुळे त्याच्या सर्व चांगल्या वाईट परिणामाची जबाबदारीही फक्त आणि फक्त त्यांचीच ठरते

योगायोग पहा, समाजवादी क्रांतीला १०० वर्षे झाल्याप्रीत्यर्थ जगभर उत्सव साजरे केले जात आहेत. आपल्या देशात मात्र अर्थक्रांतीची चर्चा आहे. पूर्वी एखाद्या विचारवंतामुळे जगात परिवर्तन व्हायचे, त्याला क्रांती म्हटले जायचे. आता मात्र वैज्ञानिक शोध आणि बाजारपेठेतील परिवर्तनामुळे जग बदलत आहे. पूर्वी युध्दे व्हायची. युध्दात कुणी जिंकायचा, कुणी पराभूत व्हायचा. आज विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवे शोध लागत आहेत. त्यातून समाज बदलतोय. या परिवर्तनाला आता क्रांती म्हटले जातेय. राजनीती आणि विज्ञान या दोन क्षेत्रात नेहमीच परिवर्तन होत असते. अशी काही घटना घडली की त्याच्या लाभहानीविषयी प्रदीर्घ काळ चर्चा चालू राहते. प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने त्याचे आकलन आणि विश्लेषण करतो. जगात अर्थक्रांती आणि राजकीय क्रांतीचे वारे मोठय़ा प्रमाणात वाहताहेत. आपल्या देशात नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्थेत जे बदल चालवले आहेत त्याची मोठी चर्चा होत आहे. जगभरातही त्याची चर्चा आहेच.

समाजवादी क्रांतीला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. १०० वर्षांपूर्वी रशियातील मजुरांनी भांडवलदारांच्या विरोधात विद्रोह केला होता. परिणामी मजूर वर्गाचे सरकार आले. साम्यवाद जगभर पसरू लागला. वर्गहीन समाज स्थापनेच्या विचारांचा प्रसार सुरू झाला. आज १०० वर्षांनंतर रशियासहित अशा प्रत्येक समाजवादी देशांमध्ये चर्चा सुरू आहे की, साम्यवादी विचाराने या देशांचे काय भले केले? लष्कराच्या ताकदीवर आपले म्हणणे लादणे सोपे आहे. कार्ल मार्क्स आणि लेनिन जरी सामान्यांना भाकर मिळवून देऊ शकले असले तरी मानवी जीवनातील अनिवार्य गरजा भागवण्यात मात्र ते अपयशीच ठरले आहेत.  त्याचबरोबर युरोपातील देश आता याही निष्कर्षावर पोहोचलेत की, विज्ञान आणि नव्या शोधांमुळे मानवी भूक मिटवण्यावर थोडेफार यश मिळवले गेले असले तरी आजही सामान्य माणूस त्रस्तच आहे, संकटग्रस्त आहे. सामान्य माणूस लाचार आहे. कार्ल मार्क्स आणि लेनिन जरी सामान्यांना भाकर मिळवून देऊ शकले असले तरी मानवी जीवनातील अनिवार्य गरजा भागवण्यात मात्र ते अपयशीच ठरले आहेत.

साम्यवादी क्रांती ही वास्तवात अर्थक्रांतीच होती. हिंदुस्थानात आज असा विचार केला जातोय की, मार्क्स आणि लेनिनच्या विचारामुळेसुध्दा जर गरिबी आणि श्रीमंतीतील भेद मिटू शकत नसेल तर त्याचे मूळ म्हणजे बाजारातील चलन हेच समाप्त का करू नये? पूर्वी जेव्हा चलन विनिमयाची पध्दत नव्हती तेव्हा वस्तुविनिमय पध्दतीने व्यवहार होत असे. तीच पध्दत पुन्हा आणायला हवी काय? यावर आता चर्चा होऊ लागली आहे. नेमके अशाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोद़ींनी नोटाबंदी केली. आता त्यांचे आणि समर्थकांचे असे म्हणणे आहे की, ज्या माध्यमातून विनिमय होतो ते चलनच बंद करण्यात आले तर केवळ काळ्या धनाचाच प्रश्न सुटणार नाही तर कॅशलेस समाज अस्तित्वात आल्यामुळे पैशांमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्या सर्व समस्या आपोआप संपून जातील.

त्यांना असे वाटते की, बाजारपेठेत सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच होतील. वस्तूंच्या किमतीही पूर्वीप्रमाणे त्याच असतील परंतु, पैसा दिसणार नाही आणि पैशाच्या देवघेवीचा व्यवहार होणार नाही. त्याऐवजी क्रेडिट आणि डेबिट कार्ड असतील. परिणामी तिजोरीत बंद पैसा आणि बेहिशेबी काळा पैसा बाजारपेठेत येईल. त्यांचे तत्त्व असे आहे की कोणत्याही प्रकारचे चलन रोखीच्या स्वरूपात दिसले नाही तर काळा पैसा निर्माणच होणार नाही. कोणताही व्यवहार सरकारपासून लपवून करता येणार नाही. खरे तर स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे, मात्र स्वप्न ही दोन प्रकारची असतात एक ती जी उच्च विचाराच्या मार्गदर्शकांना, संतांना किंवा संशोधकांना पडतात आणि दुसऱया प्रकारची स्वप्ने ही पोट खराब झाले असता पडतात. मोदींना पडलेले स्वप्न हे किती वास्तव आणि किती काल्पनिक होते हे तर काळानुरूप कळेलच, मात्र अर्थव्यवस्थेबाबत आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. अगदी राजकारण्यांइतकाच तो विनोदी कवी, कलावंतांनाही आहे.

मार्क्स आणि लेनिनच्या दृष्टीने जरी विचार करायचे म्हटले तरी सोविएत रशिया साम्यवादी सत्तेच्या रूपात एक प्रचंड ताकद म्हणून कायम का टिकू शकला नाही? सुरुवातीच्या काही दशकात साम्यवादी शक्ती एक प्रभावी शक्ती म्हणून पुढे आली. असंख्य देशात साम्यवादाचा लाल झेंडा फडकू लागला. एवढेच नव्हे तर आपल्या क्रयशक्तीच्या आधारावर रुबल हे चलन डॉलर्सच्या बरोबरीने आले. परंतु, १९८१ मध्ये असे काय घडले की, सोविएत सत्ता ढासळली आणि त्याबरोबरच जगभरातून साम्यवादी विचार नामशेष होत गेला. चीन एक महाशक्ती असल्यामुळे त्याचा अपवाद वगळता इतर सर्वच छोटे साम्यवादी देश भांडवलवादी देशांशी सलगी करू लागले. अमेरिका आणि युरोपातील भांडवलवादी देशांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करू लागले. याचाच अर्थ जेथून सुरुवात केली होती तेथेच येऊन पोहोचले.

साम्यवादी आणि भांडवलवादी अशा दोन विचारात वाटले गेलेले संपूर्ण जग पुन्हा अशा प्रकारे एक होऊ पहात आहे, जशी गोड पाण्याची नदी खाऱया पाण्याच्या समुद्रात जाऊन यासाठी विलीन होते की, पुन्हा जेव्हा तिचे रूपांतर ढगात होईल, ढग बरसतील तेव्हा पुन्हा गोड पाण्याची नदी प्रवाहित होऊ लागावी. या दोन प्रकारच्या कट्टर अर्थव्यवस्थेत जग विभाजित झालेले असताना हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचे महागुरू कौटिल्याची आठवण होणे साहजिकच आहे. परंतु त्याचा विचार आमच्या विद्यमान सत्ताधाऱयांना कुठेतरी खटकत असावा. स्वतःला संघाचे म्हणवून घेण्यात ज्यांना अभिमान वाटतो त्यांनी दत्तोपंत ठेंगडी यांच्या पुस्तकावरची धूळ झाडून त्याचे वाचन केले पाहिजे. त्यांनी म्हटले आहे की, कौटिल्याचे विचार शुध्द हिंदुस्थानी विचार आहेत. ना भांडवलवादी, ना साम्यवादी. त्याचा पाया कौटिल्याच्या अर्थशास्त्र पुस्तकाने रचला आहे. साम्यवाद्यांचे राज्यविहीन समाज ही संकल्पना जशी धाडकन जमिनीवर कोसळली. त्याच प्रकारे सत्ता प्राप्त होताच दुराभिमानी झालेल्या सत्ताधाऱयांची कॅशलेसची शेखचिल्लीटाईप स्वप्नेही एक दिवस दिल्लीच्या गल्लीत दम तोडतील. आमच्या अर्थव्यवस्थेचे आधार रिझर्व्ह बँक निश्चित करते. परंतु, नोटाबंदी किंवा कॅशलेस समाज निर्माण करण्याच्या बाबतीत आमच्या पंतप्रधानांनी या स्वायत्त संस्थेला विश्वासातच घेतले नाही. आमच्या अर्थव्यवस्थेची धोरणे निश्चित करणाऱया अनेक संस्था, संघटना आणि अधिकाऱयांना त्याची कानोकान खबर मिळू नये हे एका मर्यादेपर्यंत तर ठीक असले तरी लष्कराला विश्वासात न घेता एखाद्या सेनापतीने युध्दाची घोषणा करावी असा हा प्रकार होतो. अशा वेळी नोटाबंदीच्या प्रकरणात त्याचे जे काही परिणाम भविष्यात समोर येतील त्यासाठी पंतप्रधानांना  एकटय़ालाच जबाबदार ठरणे निश्चितच आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या