नोटाबंदीमुळे विदर्भातील शेतकरी देशोधडीला लागला

शेतकर्‍यांचे ५ जानेवारीला ‘नांगर’ आंदोलन

मुंबई— नोटाबंदीमुळे विदर्भातील सोयाबीन, कापूस, संत्रा शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांना ५० हजार रुपये मदत करा, शेतकर्‍यांना न्याय देणारा स्वामिनाथन आयोग लागू करा. नोटाबंदीमुळे हवालदिल झालेले शेतकरी प्रहार पक्षाच्या नेतृत्वाखाली ५ जानेवारी रोजी अमरावती आयुक्त कार्यालयावर नोटाबंदीविरोधात ‘नांगर’ आंदोलन करतील, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान शेतकर्‍यांसाठी एकत्र आंदोलन करण्याचे ठरले. उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शिवसेना आंदोलनात सहभागी झाल्यास शेतकर्‍यांची लढाई लवकर जिंकता येईल. त्याच अनुषंगाने हे अमरावती आयुक्त कार्यालयावर नोटाबंदीविरोधात ‘नांगर’ आंदोलन केले जाणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. शेतकर्‍यांना न्याय देणारा स्वामिनाथन आयोग लागू करावा आणि नोटाबंदीमुळे शेतकर्‍यांना होणार्‍या नुकसानीविरोधात आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

सूक्ष्म बचत गटांकडून होणारी कर्जाची सक्तीची वसुली थांबवून पूर्ण कर्जमाफी द्यावी, ठिबक सिंचनाचे प्रलंबित शेतकरी अनुदान तातडीने देण्यात यावे अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे. शेतकरी नांगर फिरवताना स्वत:चे रक्त आटवतो. तरीही शेतकर्‍यांच्या अपेक्षा व स्वप्नावर शासन नेहमीच नांगर फिरवते. अशा शासनाचे डोके सुपीक करण्यासाठी प्रतीकात्मक नांगर आंदोलन करण्यात येणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.