नोटाबंदीचे ५० दिवस संपले; हाल केव्हा संपणार?

88

एटीएम बंद, बँकांच्या दारावर गर्दी कायम

ठाणे – नोटाबंदीचे ५० दिवस उलटले तरीही लाखो ठाणेकरांचे हाल मात्र सुरूच आहेत. कष्टाचे, हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एटीएममध्ये गेलेल्यांना दोन हजारच्या एका नोटेशिवाय काही मिळत नाही. तर बँकांच्या दारांवरील रांगाही संपत नाहीत. असंख्य एटीएमबाहेर तर ‘नो कॅश’चे बोर्ड लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ठाणेकरांचा संयम संपत आला असून ‘हेच काय अच्छे दिन.. मोदीजी उत्तर द्या’, असा सवाल त्यांनी केला आहे.
ठाणे ही उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते. तसेच नोकरदार वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे. ग्राहकांच्या संख्येपेक्षाही एटीएम्सची संख्या आधीच अतिशय कमी आहे. शहरातील गोखले रोड, स्टेशन रोड, बाजारपेठ, जांभळीनाका, टेंभीनाका तसेच घोडबंदर रोड या भागात एटीएम आहेत. नोटाबंदीनंतर पुरेसे पैसेच नसल्याने अनेक एटीएम्स बंद करावे लागले. नोटाबंदीनंतर जणू एटीएमवरही अघोषित नोटाबंदी लागू झाली. मात्र ५० दिवसांनंतरही या परिस्थितीत फरक झालेला नाही. त्यामुळे ठाणेकर आता थेट मोदींनाच सवाल करू लागले आहेत.

बंद एटीएमचे तोंड बघून जगायचे काय?
कॅशलेसचं ठीक आहे, पण सगळ्या ठिकाणी ते चालत नाही. पूर्वी खिशात पैसे नसले तरीही एटीएमच्या भरोशावर बाहेर पडता यायचं. आता ती सोयही नाही. बंद एटीएमचे तोंड बघून जगायचे काय?
– अमित सावंत (नोकरदार), आंबिवली.

उधारीचा डोंगर वाढलाय
नोटाबंदीचा मोठा फटका गृहिणींनाच बसतोय. मीठ, मिरची आणि भाजीवाल्यांकडे रोकडा व्यवहार होतो. सुरुवातीचे काही दिवस निभावून नेले, पण आता त्यांच्याकडे उधार घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. उधारीचा डोंगर वाढत चालला आहे. त्यामुळे आता घराघरांमध्ये कटकटी सुरू झाल्या आहेत.
– दर्शना साळी, (गृहिणी, मीरारोड)

रोख व्यवहाराला पर्याय नाही
सगळे व्यवहार कॅशलेस कसे होणार? आम्ही वाड्यासारख्या ग्रामीण भागात राहतो. तिथे वारंवार वीज जाते मग कॅशलेस व्यवहार होणार कसे? मोदींनी हा विचार करायला नको काय? – आरती पाटील (गृहिणी), वाडा.

प्रत्येक दिवस त्रासाचा
आमच्यासारखे व्यावसायिक नोटाबंदीमुळे अर्धमेले झाले आहेत. प्रत्येक दिवस त्रासाचा आहे. १५ दिवसांत परिस्थिती बदलण्याचा दावा करणार्‍या मोदींना आम्ही एक एक दिवस कसे ढकलतोय हे माहीत आहे काय?
– विवेक खळे, (व्यावसायिक)

आमच्याच पैशांसाठी लाचार
मोदींनी नोटाबंदी करताना तळागाळातल्या लोकांचा विचार केलेला नाही. आमच्याच पैशांसाठी आम्ही लाचार झालो, यासारखी दुसरी गोष्ट असू शकत नाही.
– सुरेखा धावरे, (ज्येष्ठ नागरिक), ठाणे.

आपली प्रतिक्रिया द्या