बीड जिल्ह्यात आरोग्य खात्याचा रेड अलर्ट

45

उदय जोशी । बीड

‘सामना’ने बीड जिल्ह्यातील डेंग्यूच्या वाढत्या प्रार्दूभावावर प्रकाश टाकल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असल्याचे पाहून बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाने डास निर्मूलनाची मोठी मोहीम हाती घेतली. या मोहिमेसाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुट्या तसेच रविवारच्या सुट्या रद्द करण्यात आल्या. बीडमध्ये एकाच दिवशी डेंग्यूचे १०० रुग्ण आढळले आणि आठवड्याभरात ७०० जणांच्या प्लेटलेट कमी झाल्या. त्यामुळे आरोग्य विभागाने रेड अलर्ट दिला होता.

फवारणी करणे, पाण्यात औषध टाकणे, अनेक दिवसांपासून साठवलेल्या पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे, अत्यावश्यक पाणीसाठा योग्य प्रकारे झाकून सुरक्षित ठेवणे आदी कामं करण्यात आली. स्थानिकांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक घरी तपासणी, फवारणी आदी होईल याची खबरदारी घेण्यात आली. जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ कमलाकर आंधळे यांनी असंख्य गावं पिंजून काढली. तातडीने उपाय केल्यामुळे आता डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याचे आरोग्य खात्याने सांगितले.

डेंग्यूच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. या आठवड्यात डेंग्यूचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. आता तापी या आजाराचे रुग्णही लवकरच कमी होतील, असा विश्वास अधिकारी डॉ राधाकिसन पवार यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या