मैदानातच कोसळला एरिकसन, मेडिकल टीमने वाचवला जीव

डेन्मार्कचा मिडफिल्डर ख्रिस्तीयन एरिकसन फिनलँडविरुद्धच्या लढतीत 42व्या मिनिटाला मैदानातच कोसळला. यानंतर मेडिकल टीमने धावतपळत मैदान गाठले. डेन्मार्कच्या फुटबॉलपटूंनी हय़ुमन चेन बनवली. याच दरम्यान ख्रिस्तीयन एरिकसनचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मेडिकल टीमने कार्डियोपल्मोनेरीचे उपचार सुरू केले अन् युरो या जगातील प्रतिष्ठsच्या स्पर्धेदरम्यान चमत्कार घडून आला. ख्रिस्तीयन एरिकसनला जाग आली आणि जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या जिवात जीव आला. डॅनीश फुटबॉल असोसिएशनकडून रविवारी ख्रिस्तीयन एरिकसनची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. मात्र परीक्षणासाठी त्याला काही काळ हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

फिनलँडने सामना तर डेन्मार्कने मनं जिंकली

डेन्मार्कचा मिडफिल्डर ख्रिस्तीयन एरिकसन हा मैदानातच कोसळल्यानंतर काही वेळासाठी डेन्मार्क-फिनलँड यांच्यामधील लढत सस्पेंड करण्यात आली. पण काही क्षणानंतर पुन्हा दोन देशांमधील लढत सुरू करण्यात आली. या लढतीत फिनलँडने डेन्मार्कला 1-0 असे हरवले. पोहानपालो याने 60व्या मिनिटाला गोल करीत फिनलँडला विजय साकारून दिला. या लढतीत फिनलँडने विजय मिळवला असला तरी तमाम फुटबॉलप्रेमींची मने जिंकली ती डेन्मार्कच्या संघाने. आपला सहकारी हॉस्पिटलमध्ये अत्यावस्थेत असतानाही डेन्मार्कच्या फुटबॉलपटूंनी मैदानात उतरून देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या या कामगिरीला चोहोबाजूंनी सॅल्यूट करण्यात आला.

मानसिकरित्या फुटबॉलपटू खचले

डेन्मार्कचा संघ फिफा रँकिंगमध्ये दहाव्या स्थानावर आहे, तर फिनलँडचा संघ 54व्या स्थानावर आहे. फुटबॉल या खेळात कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो हे मान्य आहे. पण ख्रिस्तीयन एरिकसन मैदानात कोसळला नसता तर कदाचीत लढतीचा निकाल वेगळा लागू शकला असता, असा सूर या वेळी उमटू लागला. कारण जेव्हा पुन्हा ही लढत सुरू झाली तेव्हा डेन्मार्कचे खेळाडू मानसिकदृष्टय़ा खचले होते. लढतीसाठी मैदानात उतरण्याची त्यांची इच्छाच मरून गेली होती. ख्रिस्तीयन एरिकसन याने हॉस्पिटलमधून खेळ पूर्ण करण्याचा संदेश पाठवल्यानंतर ही लढत खेळण्यासाठी डेन्मार्कचे खेळाडू मैदानात उतरले.

आपली प्रतिक्रिया द्या