दंत चिकित्सक व्हा!

97

दंतवैद्यकशास्त्र ही वैद्यकशास्त्रातील करीयरची एक महत्त्वाची वाट आहे.

सौंदर्य खुलवण्याकरिता सुंदर चेहऱयाप्रमाणेच चमकदार दातांचीही आवश्यकता असते. म्हणून दातांच्या आरोग्याबाबतही लोक सजग झाले आहेत. दात आणि हिरडय़ांच्या विविध विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकरिता विज्ञान विषयात आवड असलेले विद्यार्थी ‘दंत चिकित्सा’ या विषयात पदवी संपादन करून दंत चिकित्सक होऊ शकतात. दंत चिकित्सकाचा व्यवसाय स्वतंत्ररीत्या करता येतो किंवा  सरकारी रुग्णालयांमधील दंत चिकित्सा विभागात दंत चिकित्सक/ दंत वैद्य म्हणून करीयर करता येते.

शैक्षणिक पात्रता

दंत चिकित्सक होण्याकरिता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि जीवशास्त्र या विषयांत 12वीला कमीत कमी 50 टक्के गुण आवश्यक आहेत. त्यानंतर या क्षेत्रात येण्याकरिता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नीट (नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट) ही  प्रवेश परीक्षा  पास होणे आवश्यक असते. या परीक्षेत 180 ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि जीवशास्त्रावरील प्रश्न असतात. या परीक्षेत पास झाल्यावर विद्यार्थ्यांना चार वर्षांकरिता बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी) या पदवीकरिता प्रवेश मिळतो. हा कोर्स आणि प्रवेश परीक्षा डेंटल कौन्सिलिंग ऑफ इंडियाकडून मान्यता प्राप्त आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर पाचव्या वर्षी एक वर्षाची इंटर्नशिप करणे अनिवार्य असते.

वेतन

दंतवैद्यांना सरकारी रुग्णालयात 50 हजार रुपये वेतन मिळते. जसजशी अनुभवात वाढ होईल तसे वेतनही वाढते. याव्यतिरिक्त काही दंतवैद्य स्वतःचे क्लिनिक काढूनही स्वतंत्र व्यवसाय करू शकतात. यासाठी फक्त मेहनत, अभ्यास आणि चिकाटीची गरज आहे.

कौशल्य

दंतवैद्याकडे वैज्ञानिक ज्ञानाबरोबरच कलात्मक कौशल्य असणे आवश्यक आहे. तोंडाच्या आजारांवर उपचार करणे, हिरडय़ांच्या विकारांवर उपाय, दात काढणे, कृत्रिम दात लावणे, दात आणि हिरडय़ांची शस्त्रक्रिया अशा प्रकारे तोंडाच्या विविध विकारांशी संबंधित आजारावर उपचार करून दातांचे सौंदर्य वाढविण्याकरिता दंतवैद्याकडे कलात्मक कौशल्य असणे आवश्यक आहे. याबरोबर दातांचे आरोग्य, दात आणि हिरडय़ांशी संबंधित विविध विकारांशी संबंधित आजारांपासून दूर राहण्याकरिता दंतवैद्याने लोकांमध्ये जनजागृती करण्याचीही आवश्यकता आहे.

इंटर्नशिपकरिता एनओसी महत्त्वाची

बीडीएस केल्यानंतर एक वर्षाच्या इंटर्नशिपकरिता डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाकडून विद्यार्थ्यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळणे गरजेचे आहे,  अशी सूचना डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाने केली आहे.

दंत चिकित्सा क्षेत्रातील इतर कोर्सेस

 दंतवैद्याव्यतिरिक्त काही कोर्सेस .

डेंटल सर्जन

डेंटल असिस्टंट

ओरल पॅथॉलॉजिस्ट

डेंटिस्ट प्रोफेसर

ऍकॅडमिक लेक्चरर

क्लिनिकल रिसर्च सायंटिस्ट

जनरल प्रॅक्टिशनर

दंत महाविद्यालये

गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज ऍण्ड हॉस्पिटल, मुंबई

मौलाना आझाद इन्स्टिटय़ूट ऑफ डेंटल सायन्सेस, नवीन दिल्ली

गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज ऍण्ड हॉस्पिटल, संभाजीनगर

अहमदाबाद डेंटल कॉलेज

गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ डेंटिस्ट्री, इंदूर

आपली प्रतिक्रिया द्या