दूतावासाबाहेरील लुटारूंना चाप,महागडय़ा वस्तूंना लाभले सुरक्षाकवच

मंगेश सौंदाळकर,मुंबई

व्हिसा, पासपोर्टसाठी येणाऱ्या नागरिकांचे सामान सुरक्षित ठेवण्यासाठी अवाच्यासवा रुपये घेणाऱ्या लुटारू रिक्षाचालकांना मुंबई पोलिसांनी चाप लावला आहे. अमेरिकन दूतावासाच्या परिसरात अमानती सामान कक्ष सुरू केला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम पोलीस राबवत आहेत.

वांद्रे येथील अमेरिकन दूतावासात देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक व्हिसा, पासपोर्टकरिता येतात. तेथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंना (मोबाईल, चार्जर, घडय़ाळ, पेन ड्राईव्ह, स्मार्ट वॉच) बंदी आहे. या बंदीबाबत अर्जदारांना फारशी माहिती नसते. त्यामुळे त्यांना त्या वस्तू बाहेर ठेवाव्या लागतात तर काहीजण नाइलाजास्तव वस्तू फेकून देत असायचे. वस्तू बाहेर ठेवण्याकरिता पूर्वी काही रिक्षाचालक हे अवाच्यासवा पैसे आकारत असायचे तर दूतावासात मुलाखत प्रकिया पार पडल्यावर अर्जदारांना घरच्यांशी संपर्क साधताना अडचणी येत असायच्या. नागरिकांच्या या त्रासाची दखल अखेर मुंबई पोलिसांनी घेतली. मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या संकल्पनेतून विशेष वाहन तयार करण्याचे ठरवले. नागपाडा मोटार परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त अतुल पाटील यांना वाहन तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अवघ्या काही दिवसांत अमानती सामान कक्षाची निर्मिती करण्यात आली. पोलीस समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. बीकेसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार उत्तम कांबळे, पोलीस बॉईज अमोल लांडगे, विशाल भोसले हे तिघे तेथे काम पाहतात.

मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या या कक्षामुळे आम्ही बिनधास्तपणे साहित्य लॉकरमध्ये ठेवून दूतावासात जाऊ शकतो. आमचे साहित्य सुरक्षितच राहणार आहे- कोलकाता येथील एक अर्जदार

असे आहे अमानती सामान कक्ष

वापरात नसलेल्या वाहनाचा वापर सामान कक्षासाठी केला. त्यात 88 लॉकर तयार करण्यात आले. अर्जदाराच्या 20 मिनिटे अगोदर इलेक्ट्रॉनिक वस्तू तेथे जमा केल्या जातात. नोंदवहीत नाव, मोबाईल क्रमांक नोंद केले जातात. त्यानंतर टोकन दिले जाते. सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे सामान कक्ष सुरू असते.

  • सुविधेकरिता केवळ 20 रुपये आकारले जाणार आहेत.
  • दिवसाला 70-80 बॅगा लॉकरमध्ये ठेवल्या जातात.