भंडारा रुग्णालय दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटना दुर्दैवी – नवाब मलिक

भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला असून ही दुर्दैवी घटना आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यादृष्टीने सरकार कडक नियम बनविण्याकडे लक्ष देईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या लहान मुलांबाबत तीव्र दु:ख नवाब मलिक यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या