
सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात उद्या अत्यंत बारकाईने ऑडिट करण्यात येणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची माहिती घेतली. यावेळी आमदार चेतन तुपे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी दु:ख व्यक्त केले.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहचले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 21, 2021