नोकरी-धंदा नसतानाही खात्यात 49 कोटी, झाकीर नाईकविरोधात ‘ईडी’चा दावा

84

सामना ऑनलाईन । मुंबई

नोकरी नाही, उद्योग नाही, पैसे कमावण्याचा कोणताही स्रोत नाही. असे असतानाही इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याने हिंदुस्थानातील बँकेत 49.20 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी न्यायालयात केला. झाकीर नाईकविरोधात तयार करण्यात आलेल्या या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली असून विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी याची दखल घेतली आहे.

अतिरेकी संघटनांशी संबंध, दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करणे, प्रक्षोभक भाषण करून तरुणांची माथी भडकवणे असे अनेक गंभीर गुन्हे असलेला इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक झाकीर नाईक सध फरारी असून त्याच्याशी संबंधित असलेल्या सर्व संस्था आणि त्यासंदर्भातील मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेण्याची प्रक्रिया ‘ईडी’ने सुरू केली आहे. यासंदर्भात ईडीने झाकीर नाईकविरोधात दोषारोपपत्र सादर केले आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. आझमी यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीवेळी ईडीने आपली बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, एकूण 193.06 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार करण्यात आला असून हे पैसे मुंबई-पुण्यातील जमिनीच्या व्यवहारात गुंतवण्यात आले आहेत. तसेच झाकीर नाईक याच्याशी संबंधित असलेल्या हार्मोनी मीडिया यातही हे पैसे गुंतवल्याचे ईडीनेने आरोपपत्रात म्हटले आहे. नाईक याचा विविध गुह्यांत सहभाग असून चेन्नईतील शाळेच्या बांधकामात आणि म्युच्युअल फंड यामध्ये पैशांची गुंतवणूक करण्यात आल्याचा युक्तिवादही ईडीतर्फे आज करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या