सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना दिल्लीत भाजपच्या कार्यालयाचे बांधकाम सुरू

838

दिल्लीत प्रदुषणाने नागरिकांना चांगलाच त्रास होत आहे. सामान्य नागरिकांना श्वास घेण्यात अडचण येत आहे, तसेच त्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम बालक आणि गरोदर स्त्रियांना होत आहे. दिल्लीतील प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रकारच्या बांधकाम आणि तोडकामावर बंदी आणली आहे. असे असताना दिल्लीत भाजपच्या एका कार्यालयाचे काम सुरू आहे.

न्युजलाँड्री या वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे. भाजपने मार्च 2018 मध्ये दीनदयाल उपाध्याय मार्गावर आपल्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले होते. आता 3B दीन दयाळ उपाध्याय मार्गावर 2.18 एकर जमिनीवर भाजपच्या कार्यालयाचे काम सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रदुषणामुळे दिल्लीतील सर्व बांधकाम आणि तोडकामावर बंदी घातली आहे. असे असले तरी भाजपच्या कार्यालयाचे काम सुरू आहे. न्युजलाँड्रीच्या पत्रकाराने कार्यलयाचे जिथे काम सुरू आहे तिथे जाऊन पडताळणी केली.

कार्यालयाच्या बाहेर काम बंद असल्याची पाटी सुरू आहे. परंतु हे कामाचे कंत्राट एल ऍन्ड टी कंपनीला दिले असून भाजपच्या गेस्ट हाऊसचे काम सुरू आहे अशी माहिती तिथल्या सुरक्षा रक्षकाने दिली. काही दिवस काम बंद होते परंतु गेल्या दोन तीन दिवसांपासून काम पुन्हा सुरू झाले आहे असेही त्याने पत्रकाराला सांगितले.

पत्रकार नंतर मजूरांच्या गेटने आत प्रवेश मिळवला. तेव्हा काही मजूर चहा घेत होते आणि थोडा वेळ ब्रेक घेतल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 12-13 दिवस काम बंद होते परंतु ते काम पुन्हा सुरू झाल्याची माहिती कॅन्टीन मधल्या एका कामगाराने दिली.

पत्रकाराने भाजप प्रवक्ते हरीश खुराणा यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांचे उत्तर अजबच होते. खुराणा म्हणाले की आख्ख्या दिल्लीत काम सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यालयाचेही काम सुरू आहे. आम्ही काम सुरू असताना आम्ही शेड टाकल्या आहेत. त्यामुळे धूळ पसरत नाही असे त्यांनी सांगितले.

भाजपच्या गेस्ट हाऊसचे काम का सुरू आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा खुराणा म्हणाले की हे गेस्ट हाऊसचे काम नसून भाजपच्या कार्यालयाचेच काम सुरू आहे. तसेच न्यायालयाने 15 नोव्हेंबरपर्यंत कामावर बंदी असल्याचे खुराणा यांनी सांगितले. परंतु पत्रकाराने सांगितले की जोपर्यंत कोर्ट आदेश देत नाहीत तोपर्यं बांधकामावर बंदी आहे. तेव्हा खुराणा म्हणाले की माहिती घेऊन सांगतो.

न्युजलाँड्रीच्या पत्रकारांनी काँग्रेस कार्यालयालाही भेट दिली जिथे काम सुरू आहे. दिल्लीच्या 9 कोटला रोडवर काँग्रेसच्या कार्यालयाचे काम सुरू होते परंतु कोर्टाने आदेश दिल्यानंतर ते बंद करण्यात आल्याचे आढळले. एक नोव्हेंबरपासून ते काम बंद आहे अशी माहिती पत्रकाराने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या