Ecuador Earthquake – तुर्कीनंतर इक्वाडोरमध्ये भूकंपाने हाहाकार, 14 जणांचा मृत्यू; अनेक जखमी

दक्षिण अमेरिकन देश इक्वाडोर भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी मापण्यात आली आहे. या भूकंपामुळे ग्वायास शहरामध्ये हाहाकार उडाला असून अनेक घरांना, इमारतींना तडे गेले आहेत. आतापर्यंत या भूकंपामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

‘यूएस जिओलॉजिकल सर्व्हे’ने देशाच्या कोस्टल ग्वायस भागात 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद केली आहे. भूकंपाचे केंद्र इक्वाडोरचे दुसरे सर्वात मोठे शहर ग्वायाकिलच्या दक्षिणेस सुमारे 50 मैल (80 किलोमीटर) अंतरावर होते. इक्वाडोरसह पुरूमध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले. येथेही एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

भूकंपामुळे रस्त्यावरील गाड्यांवर इमारतींचा भाग पडून मोठे नुकसान झाले आहे. तसेच भूकंपाचे धक्के जाणवू लागताच लोकं रस्त्यावर सैरावैरा पळत सुटले होते. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, याआधी तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे हाहाकार उडाला होता. यामध्ये 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 6 फेब्रुवारीला सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.8 तीव्रता होती. यानंतर अनेक इमारती कोसळल्या आणि याखाली दबून हजारो लोकांचा मृत्यू झाला.