नवरात्रीच्या आड गुटरगू करणाऱ्यांवर डिटेक्टिव्हचा वॉच

सामना ऑनलाईन। कविता लाखे

नवरात्रीमध्ये गरबा खेळण्याच्या बहाण्याने मुलगा किंवा मुलगी काही भलतं-सलतं तर करत नाहीये ना या चिंतेने पालक त्रस्त व्हायला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच ज्या विवाहीतांना त्यांच्या जोडीदारावर संशय आहे त्यांनीही जोडीदाराच्या मागे ९ दिवस गुप्तहेर नेमल्याचं समोर येतं आहे.

नवरात्रीत आबालवृध्दांना दांडियाचे वेध लागतात. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात गरबा खेळण्याच्या निमित्ताने अनेकांच्या नव्या ओळखी होतात. या दिवसात तरूण-तरुणींमध्ये खासकरून मैत्री होते. पण त्यातून काही गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरूणींना कोल्डड्रींकमधून गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच या दांडियांच्या आडून तरुणांना अंमली पदार्थ विकून त्यांना व्यसनाधीनही बनवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यामुळे या तरुणांवर नजर ठेवण्यासाठी काही पालकांनी गुप्तहेर नेमले आहेत.

लग्न झालेल्यांनी त्यांचा जोडीदार दांडियाच्या बहाण्याने काही लफडी करत नाही ना हे जाणून घेण्यासाठीही गुप्तहेर नेमले आहेत. यावर्षी हे प्रमाण ६० टक्कयांनी वाढलं असल्याची माहिती देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांनी दिली आहे. यातही तरूण जोडप्यांपेक्षा पन्नाशीतील जोडप्यांचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी सांगितल आहे. सततचा वाद आणि परस्परांवरील अविश्वास ही यामागची कारण असली तरी साथीदाराला अद्दल घ़डवण्यासाठीही काहीजण या दिवसात लफडी करायला मागेपुढे पाहत नाहीत असेही पंडित यांनी म्हटले आहे. विशेषत: देशातील इतर शहरांपेक्षा मुंबईत हे प्रमाण अधिक आहे.