26 जानेवारीपर्यंत मुंबईत धडक! यशस्वी होऊनच माघारी फिरणार; मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

इतकी आंदोलने करूनही सरकारने आरक्षणावर कुठलाच ठोस निर्णय न घेतल्याने आता 20 जानेवारी रोजी पायी आंदोलन सुरू करणार आहे. हे आंदोलन 26 जानेवारीपर्यंत मुंबईत धडकणार आहे. यात कोटय़वधी मराठाबांधव सहभागी होणार असून, आता आंदोलन यशस्वी करूनच माघारी परतणार, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. पाचव्या टप्प्यातील दौऱयादरम्यान आजारी पडल्याने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी आज रविवारी पत्रकारांशी संवाद साधला.

बीड येथील मोठय़ा सभेनंतर व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे आज जरांगे पाटील यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, सरकार आरक्षणावर ठोस निर्णय घेत नसल्याने आंतरवाली सराटी येथून 20 रोजी पायी आंदोलन सुरू करणार आहे. 26 जानेवारीला मुंबईत पोहोचल्यानंतर बेमुदत उपोषण सुरू करणार आहे. जोपर्यंत आंतरवालीत आहे, तोपर्यंतच सरकारशी चर्चा करणार आहे. मात्र आंदोलन सुरू होताच सरकारशी चर्चेची दारे बंद होणार आहेत.

मराठा सोबत नसल्यावर काय होतं हे त्यांना कळेल
मराठा आणि कुणबी एकच आणि शेतकरी असल्याने आम्हाला शेतीसह आमचे नुकसान करायचे नाही. शेतीची पूर्ण कामे आटोपून तिकडे गेल्यावर आम्ही निवांत झोपले पाहिजे. आम्ही घरी बसलो म्हणूनच आमच्या पोराचं वाटोळं झालं आहे. नेत्याला मोठं केलं, निवडणुकीपुरतं आमच्या घरी येऊन आमचाच चहा पिऊन जातो, पण आम्हालाच न्याय देत नाही. आता मराठा समाज सोबत नसल्यावर राजकीय करिअर कसं बरबाद होतं, किती सुपडा साफ होईल हे आता त्यांना कळेल, असे ते म्हणाले.

मंत्र्यांनी दिलेले शब्द पाळा
मुख्यमंत्री म्हणतात संयम पाळा. संयम म्हणजे काय हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे. तुम्ही 3 महिने मागितले, ते आम्ही दिले. पुन्हा 30 दिवस मागितले, आम्ही 40 दिवस दिले. त्यानंतरही आणखी दोन महिने वाढीव वेळ दिला. प्रत्येक वेळी तुमच्या शब्दाचा सन्मान केला. आता तुम्हीच सांगा संयम म्हणजे काय ? व्याख्या सांगितली तर मराठा समाज नक्कीच पाळेल, पण तुमच्या मंत्र्यांनी व कायदेतज्ञांनी चार शब्द दिले होते. तेच लक्षात तुम्ही लक्षात घेत नाहीत. मग आम्ही मुंबईला नाही यावे नाही तर काय करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

उपचारासाठी हॉस्पिटमध्ये दाखल
मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. ताप, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन झाले आहे. उपोषण तसेच दौऱयांमुळे डॉक्टरांनी गेल्यावेळी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. अशात आपला पाचव्या टप्प्यातील दौरा कार्यक्रम दरम्यान पुन्हा आजारी पडल्याने जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर येथे गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

भुजबळांवर पुन्हा निशाणा
मंत्री छगन भुजबळ यांनी आज जोरदार टीका केली. जरांगे काय बोलतात हे त्यांना कळत नाही. त्यांची बारा इंच छाती असा उल्लेख केला त्यावर पलटवार करताना भुजबळ यांचा काय टेलरचा व्यवसाय आहे का? असा निशाणा साधला.