देवदास येणार थ्रीडी स्वरुपात

सामना ऑनलाईन । मुंबई

देवदासची कथा रुपेरी पडद्यावर अनेकदा साकारली गेली आहे. पण संजय लीला भन्साळी यांच्या देवदासने अनेक वर्षं प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली आहे. २००२ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला या वर्षी प्रदर्शित होऊन १५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने देवदास ३डीमध्ये रिलीज होतोय.

डोळे दिपवणार्या भव्य-दिव्य सेट्समुळे देवदास पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. त्यानंतर माधुरी आणि ऐश्वर्याच्या सौंदर्याचा जलवा, श्रवणीय तितकीच प्रेक्षणीय असलेली ‘डोला’सारखी नृत्य आणि ऐकत रहावंसं वाटणारं कर्णमधुर संगीत या साऱ्यांमुळे २००२ सालात देवदास सुपरहिट ठरला होता. २००२ मध्ये प्रदर्शित झालेला हा यावेळी मात्र अजून भव्य असणार आहे. त्याच्या रूपाला एक नवी ३डी झळाळी येणार आहे.

या १२ जुलैला तो पुन्हा प्रदर्शित होत आहे. ३डी मध्ये प्रदर्शित करण्याआधी देवदासची प्रत्येक फ्रेम भन्साळी यांनी नीट पाहिली आणि समाधान झाल्यावर त्यांनी ३डी मध्ये प्रदर्शित करायचा निर्णय घेतला.