राहुल गांधी जेवढ्या सभा घेतील तेवढ्या जागा आमच्या वाढतील – मुख्यमंत्री

947

लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्याठिकाणी आम्हाला यश मिळाले. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात. ते जेवढ्या सभा घेतील तेवढ्या जास्त जागा आमच्या येतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील भाजपा -शिवसेना महायुतीचे मलकापूरचे उमेदवार चैनसुख संचेती, जळगावजामोद मतदार संघाचे उमेदवार डॉ. संजय कुटे व खामगाव मतदार संघाचे उमेदवार अ‍ॅड. आकाश फुंडकर या उम्मेदवारच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस हे रविवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी नांदुरा, वरवंड व खामगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

‘नटरंग’सारखे हातवारे करत नाही, मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आपल्या भाषणातून हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पंधरा वर्ष सत्ता भोगली त्यांनी आपली हार मानलेली आहे. त्यामुळे सगळे आश्वासने पक्षाचा जाहीरनामामध्ये देऊन टाकलेली आहे. फक्त दोनच आश्वासने द्यायची राहिली एक म्हणजे प्रत्येक कुटुंबाला एक ताजमहल आणि दुसरे म्हणजे चंद्रावर प्रत्येकाला एक प्लॉट अशी मिश्किल टीका त्यांनी यावेळी केली. यावेळी व्यासपिठावर गृहराज्यमंत्री रणजीत पार्टील, खासदार प्रतापराव जाधव उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस पुढे म्हणाले की, देशातील सर्वात मोठी कर्जमाफी महाराष्ट्रात केली. आतापर्यंत 50 लाख शेतकर्‍यांना याचा फायदा झाला असून अजूनही कर्जमाफी बंद केली नसून शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होणार नाही तोपर्यंत आमचे सरकार स्वस्थ बसणार नाही. यावेळी महाराष्ट्रात युतीचं सरकार येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था बिकट झाली असून 25 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत मध्ये येणार नाही. पाच वर्षात सर्व प्रश्न सुटले असा दावा मी करत नाही पण 5 वर्षात जे आम्ही केलं ते या पूर्वीच्या सरकारने 15 वर्षात केले नाही. आमच्या सरकारने पाच वर्षात राज्यात गरीबांना सात लाख घरे बांधुन दिली, दहा लाख घरे बांधणे सुरू आहे, 2022 पर्यंत सर्वांना घर मिळणार असे नियोजन केले जात आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच युतीचे उमेदवार संजय गायकवाड, डॉ. शशिकांत खेडेकर, श्वेता महाले, संजय रायमुलकर यांनाही विजयी करण्याचे आवाहन वरील सभेतून केले.

आपली प्रतिक्रिया द्या