तो निधी वळवलाच नाही, फडणवीस यांनी हेगडेंचा दावा फेटाळला

राज्यातील 40 हजार कोटींचा निधी वळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना औटघटकेचे मुख्यमंत्री बनवले होते असा गौप्यस्फोट भाजप खासदार अनंत हेगडे यांनी केला आहे. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच एकही पैसा केंद्राकडे गेला नाही असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अनंत हेगडे हे काय म्हणाले मला माहित नाही. माध्यमांतून मला माहिती मिळाली आहे. हे धादांत खोटे असून एकही पैसा महाराष्ट्राने केंद्राला परत केलेला नाही. बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारकडून कुठलाही निधी मिळालेला नाही. बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारच्या अखत्यारित एक कंपनी सुरू करण्यात आली आहे. जेव्हा केव्हाही बुलेट ट्रेनसाठी निधी येईल तो त्या कंपनीकडे जाईल. महाराष्ट्र सरकारकडे तो निधी येणार नाही. महाराष्ट्राकडे फक्त जमीन अधिग्रहणाची जवाबदारी आहे’’. ज्यांना अकाऊंटची पद्धत माहित आहे त्यांना ही गोष्ट कळेल की असे पैसे वळवता येत नाहीत असेही फडणवीस म्हणाले.

तसेच आपण काळजीवाहू मुख्यमंत्री असताना किंवा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकही धोरण राबवण्याचा निर्णय घेतला नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्याचा एकही पैसा केंद्राकडे गेला नाही, केंद्र सरकार मागणार नाही असेही फडणवीस यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या