शिंदे गटाच्या घोषणावीर मंत्र्यांवर देवेंद्र फडणवीस संतापले

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठचा पुढचा विचारता न करता घोषणा करणाऱ्या मंत्र्यांना झापले आहे. खासकरून अब्दुल सत्तार यांना फडणवीसांनी धारेवर धरल्याचे कळते आहे. सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये केंद्रातील पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात नवीन सन्मान योजना राबवावी किंवा केंद्रातील योजनेत राज्याचा काही वाटा समाविष्ट करून शेतकऱ्यांना मदत योजना सुरू करावी यासाठी चर्चा सुरू होती. मंत्रालयात ही बैठक सुरू असताना याबाबतची माहिती बातमी प्रसारमाध्यमांमध्ये झळकायला लागली. ही माहिती फोडल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांना झापल्याचे कळते आहे.

शेतकरी सन्मान योजनेबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना तुम्ही ही माहिती जाहीर कशी केली? असा सवाल फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांना केली. फडणवीसांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त करत सत्तार यांना खडसावले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही संतापल्याचे दिसल्याने अब्दुल सत्तार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.निर्णय झाल्याचे माध्यमांना म्हणालो नाही, तर विचार सुरू असल्याचे आपण माध्यमांना सांगितले असं म्हणत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या उत्तराने फडणवीसांचे समाधान झाले नाही. यामुळे त्यांनी परस्पर लोकप्रिय घोषणा करणाऱ्या सर्वच मंत्र्यांना सक्त ताकीद दिली.

कोणताही निर्णय जाहीर करण्याचे अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडेच आहेत. एखाद्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी देणे किंवा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही मंत्र्याने अशा सवंग घोषणा करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करा, परस्पर घोषणा करू नका अशा शब्दात फडणवीसांनी घोषणाबीर मंत्र्यांना तंबी दिली.