
भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी नागपुरातील महानगर दंडाधिकाऱ्यांनी आपला आदेश शुक्रवारी सुनावला. फडणवीस यांना सदर प्रकरणात निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर 1996 आणि 1998 मध्ये दोन गुन्हे दाखल झाले होते. मात्र त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात ही माहिती लपवून ठेवली. दोन्ही प्रकरणांत त्यांना जामीन मंजूर झाला होता; परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अर्ज भरताना त्यांनी या प्रकरणांची माहिती उघड केली नाही, असा आरोप फडणवीस यांच्यावर होता.
फडणवीसांचे वकील उदय डबले यांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाबद्दल माहिती देताना सांगितले की, “लोकप्रतिनिधी कायद्या अंतर्गत गुन्हा सिद्ध होण्यासाठई ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या या प्रकरणात सिद्ध झालेल्या नाही. महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर सदर प्रकरणाची सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने फडणवीसांची निर्दोष मुक्तता केली आहे.”