उपासना

सुवर्णा क्षेमकल्याणी

महाराष्ट्राप्रमाणे देशाच्या इतर प्रांतांतही देवीची उपासना तितक्याच भक्तिभावाने केली जाते.

जगदंबेची उपासना केवळ आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस तर पूर्ण भारलेले… मंतरलेले… तिच्या प्रत्यक्ष अस्तित्वाने… तिचे युद्धकौशल्य… तिचे उपवास… तिच्या श्रमपरिहारार्थ रात्री होणारे मनोरंजनाचे खेळ… एक ना अनेक प्रथा. ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात घटस्थापना होते त्याप्रमाणे देशाच्या इतर प्रांतांमध्येही देवी उपासना विविध प्रकारे साजरी केली जाते.

असा साजरा होतो सण…महाराष्ट्रात नवरात्र मोठय़ा उत्साहात साजरा केली जाते. घटस्थापनेच्या दिवशी मराठवाडय़ाचे लोक नवीन टोपली आणून त्यात काळी माती भरतात. माती थोडी ओली करून त्यात देवीचा कळस मांडतात. कलशाच्या बाजूने एकरंगी, पंचरंगी किंवा सप्तरंगी वेगवेगळे धान्य किंवा कडधान्य पेरतात. नऊ दिवस नऊ माळा घालतात. ज्या दिवशी घट बसतात त्या दिवशी घटाला नऊ विडय़ांच्या पानांची माळ घालतात. त्यानंतर रोज झेंडूच्या फुलांची माळ घालतात. तिसऱया दिवशी तिळाच्या फुलांची माळ घातली जाते. अष्टमीला फुलोऱयांची माळ घातली जाते (फुलोरा म्हणजे मैद्याची फुलं) त्याच दिवशी कुमारिकांना जेवायला बोलावलं जातं. नवरात्रीचे नऊ दिवस उपवास केला जातो. अहोरात्र तेलाचा दिवा तेवत ठेवला जातो. अष्टमीला संध्याकाळी महालक्ष्मीच्या तांदळाच्या पिठाची मूर्ती केली जाते. महालक्ष्मी पुढे घागरी फुंकतात.

बंगाल….बंगाली लोकांमध्ये प्रत्येकाच्या घरात दुर्गादेवीची स्थापना होत नाही तर सार्वजनिकरीत्या दुर्गादेवीची स्थापना करतात. सर्व बंगाली लोक एकत्र येऊन नवरात्रीचा हा उत्सव मोठय़ा आनंदात साजरा करतात. दुर्गादेवीची ही मूर्ती मोठी आणि मनमोहक असते. डाव्या-उजव्या बाजूला गणपती, सरस्वती, लक्ष्मी व कार्तिकेय स्वामी यांचीही प्रतिष्ठापना करतात. सप्तमीला दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्यावेळी पूजा करून होम-हवन केलं जातं. अष्टमीला कुमारिकापूजन केलं जातं. त्यावेळी १ ते ११ वर्षांच्या वयोगटातील मुली बोलवून त्यांना दुर्गादेवीप्रमाणे सजवून त्यांची पूजा केली जाते. नवमीच्या दिवशी संधिपूजेचा कार्यक्रम असतो. ही पूजा रात्रीच करतात. दसऱयाच्या दिवशी सर्व बंगाली लोक एकत्र येऊन आरती करतात आणि नंतर देवीचं विसर्जन करतात. बंगालमधील नवरात्रोत्सव प्रसिद्ध आहे. बंगालमध्ये नवरात्रातील शेवटचे पाच दिवसच पूजा केली जाते. पाचव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला देवीचं विसर्जन होतं. बिहार आणि आसाममध्येही अशाच पद्धतीनं दुर्गापूजा आणि विजयादशमी साजरी होते.

तामीळनाडू….देवीच्या प्रतिमेसमोर तांदळाच्या राशीवर कलश मांडण्यात येतो. अष्टमीच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपापल्या वापरातील वस्तू एका पांढऱया कापडात गुंडाळून देवीसमोर ठेवतात. या वस्तूंची दशमीपर्यंत गोंडय़ाची फुलं वाहून पूजा केली जाते. नंतर दशमीच्या दिवशी संध्याकाळी वस्तू पुन्हा वापरात घेतल्या जातात. या वस्तूंमुळे शिक्षण, व्यापार वृध्दिंगत होतो असं मानलं जातं. दशमीच्या दिवशी ज्या मुलांना शाळेत दाखल केलं जाणार असतं, त्यांना देवीसमोर आणतात. त्याच्या वडिलांच्या हातातली अंगठी दुधात बुडवून बालकाच्या जिभेवर ओम काढतात किंवा तांदळाच्या राशीवर ‘ओम हरी गणपतये नमः अविघ्नमस्तु’ असं लिहिलं जातं. या कृतीमुळे मुलांच्या शिक्षणात प्रगती होते, अशी येथे श्रद्धा आहे.

कर्नाटक….येथे नवव्या दिवशी केली जाणारी आयुधपूजा महत्त्वाची असते. माहिती तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या या राज्यामध्ये नव्या युगातील संगणक, पुस्तकं, वाहनं, स्वयंपाकघरातील उपकरणांची पूजा केली जाते. रोजच्या वापरातील वस्तूंमधील दैवत शोधण्याचा आणि त्यांच्यामुळे आयुष्य सोपं होतं त्याबद्दल व्यक्त केलेली ही कृतज्ञताच जणू. त्यातही उपजीविकेसाठीच्या हत्यारांची पूजा केली जाते. काही ठिकाणी शस्त्रपूजाही केली जाते.

गोवा…गोव्यात ज्या ठिकाणी शक्तीदेवीची मंदिरं आहेत, त्या ठिकाणी मोठय़ा उत्साहात नवरात्रोत्सव साजरा होतो. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीला हंस, मोर, गरूड आदी कलाकृती फुलांनी सजवलेल्या रथात आरूढ करून पुजले जाते.

नवरात्र अन् गुजरात समीकरणच..नवरात्र आणि गुजरात हे जणू समीकरणच होऊन गेलंय याचं कारण तिथला गरबा आणि दांडिया रास… घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी घरातील उमियादेवीला पंचामृताने अभिषेक केला जातो. देवीची विधिवत पूजा केली जाते. नऊ दिवसांसाठी देवीसमोर अखंड दिवा तेवत ठेवतात. त्याला ‘दीप गरभ’ म्हटलं जातं. घरातील पुरुष किंवा महिला यापैकी एकजण नऊ दिवस कडक उपवास करतो. या उपवासामध्ये शिंगाडा, शेंगदाणे, राजगिरा, साबुदाणा या पदार्थाचं सेवन केलं जातं. नऊ दिवस सकाळ-संध्याकाळ देवीची आरती केली जाते. देवीला केळे, गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी घरातील सवाशीण महिला देवीसमोर फेर धरून कमीत कमी पाचवेळा तरी गरबा खेळते. अष्टमीला देवीची महापूजा केली जाते. देवीसमोर होमहवन करण्यात येतं. त्या दिवशी घरातील लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळे जण उपवास करतात. नवमीच्या दिवशी देवीला थाळीचा महानैवेद्य दाखवला जातो. यामध्ये साधी पोळी, हरभरे, चक्रीची भाजी, उडदाच्या डाळीचे वडे, चुरम्याचे लाडू, तांदळाची खीर, लापशी, वरण-भात या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. याच दिवशी देवीसाठी साज तयार केला जातो. वेणी, फणी, पोळपाट-लाटणे यांसारख्या वस्तू कणकेपासून बनवल्या जातात. त्या नैवेद्यावर मांडल्या जातात. हा सगळा साज नऊ पोळ्यांवर ठेवला जातो. त्यावर नऊ कणकेचे दिवे ठेवून देवीची आरती केली जाते.

 

आपली प्रतिक्रिया द्या