लेख – महाराष्ट्र बँक आणि भवितव्य

bank-of-maharashtra

>> देविदास तुळजापूरकर ([email protected])

महाराष्ट्र बँकेचा जन्म स्वदेशी चळवळीतून झाला होता. बँकेच्या नावातील महाराष्ट्रहे या बँकेचे खरे भांडवल. या बँकेला स्वतःचा इतिहास, भूगोल आहे तशी एक संस्कृतीदेखील आहे. महाराष्ट्र राज्यात खोलवर या बँकेची मुळे रुजलेली आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून या बँकेत घडून आलेले बदल निश्चितच चिंता करायला लावणारे आहेत. महाबँक एक अखिल हिंदुस्थानी बँक जरूर व्हावी, ही काळाची गरजच आहे, पण महाराष्ट्र राज्य ही तिची ओळख पुसून नव्हे! आज म्हणजे 8 फेब्रुवारी हा महाबँकेचा व्यवसाय प्रारंभ दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त लेख

बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्र राज्याची एक अग्रणी बँक. याशिवाय संभाजीनगर, जालना, नाशिक, सातारा,  पुणे आणि ठाणे जिह्यांसाठी ही बँक अग्रणी बँक म्हणून काम करते. या बँकेने महाराष्ट्र ग्रामीण बँकेला पुरस्कृत केले आहे, जी विदर्भ आणि कोकण सोडता उर्वरित महाराष्ट्रात प्रामुख्याने ग्रामीण भागांत काम करते. महाराष्ट्र बँकेच्या 30 सप्टेंबर 2022 रोजी राज्यात एकूण शाखा आहेत 1 हजार 126. त्यातील ग्रामीण भागांत 456, निमशहरी भागांत 304, शहरांत 96 आणि महानगरांत 270 शाखा आहेत. बँकेच्या राज्यातील एकूण ठेवी आहेत 1.49 लाख कोटी, तर कर्ज 0.74  लाख कोटी रुपये आणि एकूण व्यवसाय 2.23 लाख कोटी रुपये आहेत. मात्र  मार्च 2016च्या तुलनेत बँकेच्या एकूण शाखा कमी झाल्या आहेत 45, तर ग्रामीण भागांतून 50 शाखा कमी झाल्या आहेत. निमशहरी भागांत 13 शाखा वाढल्या आहेत, तर नगर आणि महानगर मिळून 8 शाखा कमी झाल्या आहेत. या काळात ठेवीत वाढ झाली आहे 0.54 लाख कोटी रुपये, तर कर्ज 0.11 लाख कोटी रुपये. ठेवीच्या  तुलनेत कर्जाचे प्रमाण 2016 मध्ये 65.87 टक्के होते, जे आज घसरून 50 टक्क्यांवर आले आहे. सप्टेंबर 2022 मध्ये राज्यातील सर्व बँकांचे मिळून एकूण ठेवीशी निगडित कर्जाचे प्रमाण आहे 101 टक्के. त्या तुलनेने राज्याची अग्रणी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबँकेतील ठेवीच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण 50 टक्के म्हणजे निम्म्यावर आले आहे.

महाराष्ट्र बँकेचा जन्म स्वदेशी चळवळीतून झाला होता. महाराष्ट्र राज्यातील मध्यमवर्ग, छोटे व्यापारी, छोटा उद्योजक, पेन्शनधारक म्हणजे सामान्य माणूस ही या बँकेची ओळख. राष्ट्रीयीकरणापर्यंत ही बँक प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यापुरतीच मर्यादित होती. राष्ट्रीयीकरणानंतर राज्याबाहेर या बँकेने आपला शाखा विस्तार केला तरी मराठी माणसाची बँक ही तिची ओळख कायम होती. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 साली झाली होती, पण त्याअगोदर म्हणजे 16 सप्टेंबर 1935 रोजी महाबँकेची स्थापना झाली होती, तर व्यवसायाची सुरुवात आजच्याच दिवशी म्हणजे 8 फेब्रुवारी 1936 रोजी झाली होती. राज्याच्या स्थापनेअगोदर बँकेच्या संस्थापकांनी महाराष्ट्र राज्य कल्पिले होते.  ही त्यांची दूरदर्शिता होती. बँकेच्या नावातील ‘महाराष्ट्र’ हे या बँकेचे खरे भांडवल. राज्यातील पहिल्या पिढीतील सगळ्या उद्योगांना या बँकेने वित्तीय आधार दिला, म्हणून आज हे उद्योग मोठे झाले आहेत, फुलले आहेत.

राज्यातील तुळजापूर, पंढरपूर, शिर्डी, शनिशिंगणापूर, शेगाव, अक्कलकोट, कोल्हापूर, ज्योतार्ंलगांची तीर्थस्थाने, वेरूळ, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अष्टविनायकांची तीर्थस्थाने प्रत्येक ठिकाणी महाबँक आहे. एवढेच काय, आनंदवन, राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, भामरागड अशा प्रत्येक ठिकाणी महाबँक आहे. या बँकेला स्वतःचा इतिहास, भूगोल आहे तशी एक संस्कृतीदेखील आहे. महाराष्ट्र राज्यात खोलवर या बँकेची मुळे रुजलेली आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून या बँकेत घडून आलेले बदल निश्चितच चिंता करायला लावणारे आहेत. महाबँक एक अखिल हिंदुस्थानी बँक जरूर व्हावी, ही काळाची गरजच आहे, पण महाराष्ट्र राज्य ही तिची ओळख पुसून नव्हे! शाखाविस्तार असो की, ठेवींच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण असो, जाणीवपूर्वक महाराष्ट्र राज्याला डावलले जात आहे. महाबँकेतील संचालक मंडळात अपवादानेच मराठी माणसाची नियुक्ती झाली आहे, जणू मराठी माणसे या पदावर बसण्यास लायकच नाहीत. आताचे अर्थराज्यमंत्री, जे बँकिंग विभाग पाहतात ते डॉ. भागवत कराड आल्यानंतरदेखील या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही.

 महाबँकेतील कर्मचारी सतत नोकरभरतीच्या मागणीसाठी रस्त्यावर येत आहेत. तृतीय तसेच चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती या बँकेने जवळ जवळ बंदच केली आहे. ज्यामुळे मराठी मुलांना अन्यथा जी नोकरीची संधी मिळाली असती तीही आता उपलब्ध नाही. या बँकेने आपल्या आपल्या व्यवसायाच्या प्रक्रियेत आणि पद्धतीत असे बदल केले आहेत की, ज्यामुळे जो सामान्य माणूस या बँकेचा आत्मा होता, आधार होता, ओळख होती, तो बँकेच्या परिघाबाहेर जात आहे. ही खरोखरच मराठी माणसासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी चिंतेची बाब आहे, पण आजच्या राजकीय सुंदोपसुंदी कोणाला आहे वेळ अशा महत्त्वाच्या प्रश्नांना भिडण्यासाठी.

 महाबँकेला आपल्या या प्रवासात अनेक आपत्तींतून जावे लागले आहे. पानशेत धरण फुटले तेव्हा सर्वत्र हाहाकार माजला होता. तेव्हा सामान्य माणसाला या बँकेने जो आधार दिला, त्याला तोड नाही. 1991 साली नवीन बँकिंगविषयक धोरण आल्यानंतर बँकेला विक्रमी तोटा झाला होता. 2016 साली पाच कोटी रुपयांवरच्या कर्जखात्याची फेरतपासणी झाल्यानंतर बँक सलग तीन वर्षे तोटय़ात गेली होती. पाच वर्षांपूर्वी एका खोटय़ा कारणासाठी बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि पुण्यातील झोनल मॅनेजर यांना जेलमध्ये टाकण्यात आले होते, पण या सगळ्या टप्प्यांवर महाबँकेतील कर्मचारी, अधिकारी आणि ग्राहक यांनी एकजुटीने त्या संकटावर मात केली. म्हणूनच महाबँक  एकत्रीकरणाच्या झंझावातातदेखील आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकली, पण आज ज्या पद्धतीने या बँकेची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो मात्र धोकादायक आहे. यावर मराठी जगातील आर्थिक आघाडीवरील धुरिणांनी काही भूमिका घ्यायला हवी. तरच ही बँक, मराठी माणूस आणि त्यांचे आर्थिक जगतातील भविष्य आश्वासक असेल.