खेकडे पकडायला आलेल्यांनी सुरक्षा रक्षकाला जाळले, तरुणाचा मृत्यू

1308

दोन जणांनी पेटवून दिल्याने नवी मुंबईमध्ये एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. देवीदास उगालवे (वय-30 वर्षे) असं या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तो कळंबोलीतील रेल्वेच्या कारशेडमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. त्याचे वडीलही इथेच सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत. ज्या दिवशी हा प्रकार झाला त्या दिवशी ते सकाळच्या ड्युटीला होते.

देवीदासचा मृत्यूपूर्वी पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. जबाबानंतर त्यांनी 2 अज्ञात आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. देवीदासवर ऐरोलीतील नॅशनल बर्न्स रुग्णालयात उपचार सुरू होते. 21 जुलैच्या रात्री त्याने पोलिसांना जबाब दिला होता. देवीदासची प्रकृती सुधारेल असं त्याच्या कुटुंबियांना वाटत होतं, मात्र त्याची प्रकृती खालावत गेली आणि 27 तारखेला त्याचा मृत्यू झाला. 20 जुलैच्या रात्री त्याला जाळण्यात आले होते. देवीदासचा भाऊ हा महाराष्ट्र सुरक्षा दलात असून तो अकोला इथे तैनात आहे. मुलाच्या मृत्यूनंतर देवीदासच्या आईला जबर धक्का बसला असून ती बोलेनाशी झाली आहे.

खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोग्ये यांनी मुंबई मिरर या वर्तमानपत्राशी बोलताना म्हटले की देवीदास हा टेंबोडे गावातील कारशेडमध्ये कामावर रुजू झाला होता. तिथे दोन अज्ञात माणसे खेकडे पकडण्यासाठी आली होती. या दोघांकडे पेट्रोलचा कॅनही होता. या दोघांसोबत देवीदासची बाचाबाची झाली. या दोघांनी देवीदासला मारहाण केली आणि नंतर पेटवून दिले. देवीदासला दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ला शुद्ध आल्यानंतर तो स्वत: कसाबसा चालत घरी गेला होता. त्याची अवस्था इतकी खराब होती की त्याच्या आईनेही त्याला ओळखले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या