तुळजापूरला भवानी मातेचे दर्शन घेऊन घरी परतत असताना भाविकांच्या कारचा अपघात झाला. कारने पाठीमागून मालट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये शिरोळ तालुक्यातील दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास सोलापूर-सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास (ता. सांगोला) येथे हा अपघात झाला.
सुखदेव बामणे (वय – 40) व नैनेश कोरे (वय – 31, दोघेही रा. नांदणी ता. शिरोळ जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत, तर अनिल शिवानंद कोरे (वय – 42, रा.नांदणी ता शिरोळ ), सुधीर चौगुले (वय -35, रा.वडगाव ता हातकणंगले) आणि सुरज विभुते (वय – 21, रा.कोथळी ता. शिरोळ) हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक व सांगोला पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार बाजूला केली आणि जखमींना उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र रविवारी एम. एच. 09 एफबी- 3908 या कार मधून तुळजापूर येथे भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर पाचही जण सोलापूर हायवेने गावाकडे निघाले होते. सांगोल्याजवळील चिंचोली बायपासवर भरधाव कारने डाळिंब घेऊन जाणाऱ्या 16 चाकी ट्रकला (एम. पी. 20 झेड एम 9518) जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील दोघेजण उडून बाहेर फेकले गेले. तर चालक कारमध्ये अडकून पडला होता. त्याला पोलिसांनी बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले.