कृष्णभक्तीशी एकरूप झालेले सूरदास

<< मंदा आचार्य>>

अंधत्व, निराधारता, निरक्षरत्व या सर्वावर मात करून केवळ सुरांच्या वारूवर आरूढ होऊन सूरदासांनी जीवनात काव्यसृष्टी पादाक्रांत केली, त्याला इतिहासात तोड नाही. कृष्णाची भक्ती, सामाजिक प्रतिष्ठा आणि जनताजनार्दनाचं प्रेम सारंकाही सूरदासांना मिळालं. सूरदास यांना हिंदी साहित्यातील सूर्य असं म्हटलं जातं. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊनच की काय, ईश्वराने त्याना 101 वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य बहाल केलं.

‘‘मैया देखो न, मेरे साथ कोई भी खेलता नही। बडा भैया भी मुझे चिढाता है। मै क्या करू?’’ बाल सूरदास आपल्या मैयाला रडत रडत म्हणाले. ‘‘देखो बेटा, यह लल्ला की मूरत है, तू इसके साथ खेल.’’ मैया म्हणाली. सूरदास त्या मूर्तीशी खेळू लागले. त्याच्यासंगे गाऊ लागले आणि त्यांच्या सुरातून गाण्यांचा वर्षाव होऊ लागला.

सूरदासांच्या जन्म-मृत्यूविषयी इतिहासाला निश्चित माहिती नाही. सर्वसाधारणपणे इ. स. 1478 ते 1580-84 हा त्यांचा कालखंड मानला जातो. सूरदासांचा जन्म मथुरेच्या जवळ रुणक्त नावाच्या एका खेडय़ात झाला. त्यांचे वडील पंडित रामस्वामी पेशाने पंडित होते, पण या जन्मांध बालकाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. मातेने त्यांची तात्पुरती समजूत घातली. पण सूरदासांचं त्याने समाधान झालं नाही. वयाच्या 6 व्या वर्षीच त्यांनी घराला राम राम ठोकला आणि यमुनेच्या तीरावर बसून ते आपली कृष्णलीला गाऊ लागले. त्यांच्या गळ्यातून सुमधुर, सुश्राव्य भजनं येऊ लागली. यमुनेच्या काठी त्यांची काव्यगंगा उगम पावली. लोक तल्लीनतेने ऐकू लागले. गाता गाता सूरदास ‘कवी सूरदास’ झाले. सुरांचा दास म्हणून ‘सूरदास’! सूरदासांच्या बहुतेक सर्व काव्यांतून त्यांनी कृष्णाच्या बाललीलांचं वर्णन केलं आहे.

मैया मोहि दाऊ बहुत खिझायै; मोसौ कहत मोल कौ लीन्हौ; तू जसुमती कब जायौ?

कह करो इहि के मारे खेलन हौ नही जात; पुनिपुनि कहत कौन है माता; कौ है तेरा तात?

गोरे नन्द जसोदा गोरी तू कल स्यामल गात चुटकी दैदै ग्वाल नचावत हसतसबै मुसकात।

तू मोहि की मारन? सीखी दाऊहि कब खीझै; मोहन मुख रिस की ये बातेः जसुमति सुनि सुनि रीझै।

सुनहु कान्ह बलभद्र चबाईः जनमत ही कौ धूत; सूर स्याम मौहि गोधन की सौ हा माता तो पूत।

यात सूरदासांनी जणू काही आपलीच कैफियत मांडली आहे.

(अर्थः बालकृष्ण यशोदेला सांगतो की, ‘‘तो बलरामदादा मला खूप चिडवतो. तो म्हणतो की, तू मला धन देऊन विकत घेतलं आहेस. तू मला जन्म दिलेला नाहीस. म्हणून मी त्याच्याबरोबर खेळायला जाणार नाही. तो मला एकसारखा विचारतो की, तुझे मातापिता कोण? नंदबाबा आणि यशोदामाता दोघेही गोरे आहेत. तर तू काळा कसा? असं म्हणून तो उडय़ा मारायला लागतो. मग त्याच्यासह सगळेच गोपी मला हसू लागतात. तू मात्र नेहमी मलाच मार देतेस. दादाला तू कधीच मारीत नाहीस. तू मला शपथेवर सांग की, मी तुझाच मुलगा आहे.’’ कृष्णाची ही तक्रार ऐकून यशोदा मंत्रमुग्ध झाली.)

एकदा एका यात्रेत मथुरेला वृंदावनमध्ये सूरदासांची वल्लभाचार्यांशी भेट झाली. सूरदासांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं.

त्यांची ब्रिज भाषेतील भजनं आजही लोकांच्या मनात घोळत आहेत. उदा. ‘मैया मै नही माखन खायौ…’ मनाची शुद्धता, भाषेचा साधेपणा आणि शब्दचित्रात्मक शैली यांनी त्यांची पदे नटलेली असत. सूरदासांनी कृष्णाचं सारं चरित्र आपल्या काव्यातून साकार केलं आहे. सूरदासांनी एकूण 1 लाख पद्यरचना केल्या. दुर्दैवाने त्यापैकी फक्त 8 हजार आज उपलब्ध आहेत. ‘सूरसागर’ हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह. याशिवाय ‘सूर-सरावली’, ‘साहित्यलहिरी’ हेही त्यांचे विविध विषयांवरील काव्यसंग्रह आहेत. ‘साहित्यलहिरी’ हा त्यांचा ग्रंथ आध्यात्मिक आहे.

त्यांच्या निरागस भावुकतेने आणि वाङ्मयीन गुणांनी त्यांना खूप कीर्ती मिळवून दिली. इतकी की, एकदा सूरदासांना अकबर बादशहाकडून भेटीचं निमंत्रण आलं. सूरदासांनी नम्रपणे बादशहाला निरोप दिला, ‘मी बादशहांची भेट घेऊ इच्छित नाही; परंतु बादशहांना वाटत असेल तर ते इथे येऊ शकतात.’ अकबर बादशहा आपल्या लवाजम्यासह सूरदासांच्या भेटीला आला. भेट झाली. परंतु सूरदासांनी बादशहाचा नजराणा नाकारला. ते म्हणाले, ‘बादशहा, कन्हैयाच्या प्रेमाने मी तृप्त आहे. माझं गाणं ऐकलंत, ठीक आहे. मला नजराणा नको.’

बादशहाने विचारलं, ‘कविराज, मला सांगा, तुम्हाला काय हवं आहे?’ सूरदास आत्मविश्वासाने म्हणाले, ‘मला एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे हिंदूंवर असलेला जिझिया कर तेवढा रद्द करा.’ हिंदूंवरील तो कर त्वरित रद्द झाला.

तत्कालीन हिंदू समाजात आलेल्या भक्तिपर्वाशी सूरदास एकरूप होऊन गेले. सूरदासांची पद्यरचना सगुण भक्तीत मोडणारी असली तरी त्यांना निर्गुण, निराकार शक्तीचं भान होतं. त्या अव्यक्त रूपावरही त्यांनी काव्यं रचली आहेत. परंतु त्यांच्या मते सर्वसामान्य संसारी माणसांना ते निर्गुण रूप समजण्यास अवघड असल्याने सगुण भक्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी श्रीकृष्णाची नामरूपी भक्ती आवश्यक आहे.

अबिगत गति कछु कहति आवै

ज्यों गूंगो मीठे फल की रस अंतर्गत ही भावै

परम स्वादु सबही जु निरंतर अमित तोष उपजावै

मन बानी कों अगम अगोचर सो जाने जो पावै

रूप रैख गुन जाति जुगति बिनु निरालंब मन चकृ चावै

सब बिधि अगम बिचारहिं तातों सूर सगुन लीला पद गावै

(अर्थ ः अव्यक्त उपासना अवघड आहे. तो मन आणि वाणीचा विषय होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे मुक्या माणसाला मिठाई खायला दिली आणि त्याला त्याची चव विचारली तर तो सांगू शकणार नाही. त्या मिठाईचा आनंद फक्त त्याच्या अंतर्मनाला समजू शकेल. निराकार ब्रह्माला ना रूप ना गुण. म्हणून मन तेथे स्थिर होऊ शकत नाही. अर्थात ते अगम्य आहे. म्हणून सूरदास सगुण ब्रह्म म्हणजेच भगवान श्रीकृष्णाची उपासना करणंच पसंत करतात.)

अंधत्व, निराधारता, निरक्षरत्व या सर्वावर मात करून केवळ सुरांच्या वारूवर आरूढ होऊन सूरदासांनी जीवनात काव्यसृष्टी पादाक्रांत केली, त्याला इतिहासात तोड नाही. कृष्णाची भक्ती, सामाजिक प्रतिष्ठा आणि जनताजनार्दनाचं प्रेम सारंकाही सूरदासांना मिळालं. सूरदास यांना हिंदी साहित्यातील सूर्य असं म्हटलं जातं. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊनच की काय, ईश्वराने त्याना 101 वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य बहाल केलं.

 

आपली प्रतिक्रिया द्या