
तालुक्यातील मढी येथे फुलोराबाग यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागांतून मोठय़ा संख्येने आलेल्या कावडीच्या पाण्याने कानिफनाथ महाराजांच्या समाधीला अभिषेक करण्यात आला, तर कानिफनाथांचे निशाण भेट शांततेत पार पडून कावड मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. निशाण भेटीच्या वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
फुलोराबाग यात्रेचा शेवटचा टप्पा मढी-निवडुंगे गावाच्या शिवारात साजरा होतो. मढी येथे समाधी घेण्यापूर्वी कानिफनाथ महाराज विंश्रांतीसाठी जेथे थांबले होते, त्या जागेवर फुलोराबाग यात्रा भरते. अनेकजण नवसाची पूर्ती करण्यासाठी फुलोराबाग यात्रेला आवर्जुन हजेरी लावतात. पैठण येथून गंगेचे पाणी घेऊन आलेल्या कावडी सोमवारी सायंकाळी मढी शिवारात दाखल झाल्या होत्या. या कावडी आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वाजतगाजत कानिफनाथ मंदिराकडे निघाल्या. अग्रभागी मढी, पैठण, कासार पिंपळगाव, माळी बाभुळगाव, सुसरे या गावच्या कावडी होत्या. आलेल्या कावडीची निशाणभेट घेण्यासाठी कानिफनाथांची पालखी गडावरून निघाली. मानाच्या पाच कावडींची निशाणाची भेट मढी गावातील लक्ष्मीआई मंदिराजवळ झाली. यानंतर नाथांच्या समाधीला जलाभिषेक सुरू करण्यात आला.
फुलोराबाग यात्रेची शेकडो वर्षांची परंपरा असून, पालखीमार्गावर अनेक भाविक आपल्या लहान मुलांना मिरवणुकीपुढे झोपवतात. कावडीवाले भाविक या मुलांना ओलांडून पुढे जातात. कानिफनाथांच्या पालखी दर्शनासाठी मोठय़ा संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांतून आलेल्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. यावेळी विविध गावांच्या भाविकांनी महाप्रसादाचे वाटप केले. देवस्थान समितीने कावड यात्रेचे उत्कृष्ट नियोजन केल्याने यंदा वाद झाले नाहीत. स्थानिक कावडीवाल्यांसाठी स्वतंत्र रांग, तर अन्य भाविकांसाठी दर्शनबारीतून सुविधा करण्यात आली होती. मढी देवस्थान अध्यक्ष बबन मरकड, विश्वस्त भाऊसाहेब मरकड, रवींद्र आरोळे, श्याम मरकड यांनी भाविकांचे स्वागत केले.