गणेशोत्सवाला गावी जाण्याची महाराष्ट्रात प्रथाच, हायकोर्टाने तूर्त नाकारली थीमची कॉपीराईट

चाकरमानी गणपतीला गावी जातच असतात. गणेश उत्सवाला गावी जाण्याची महाराष्ट्रात प्रथाच आहे. या थीमवर कोणाचीच कॉपीराईट असू शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्या. मनीष पितळे यांनी हे निरीक्षण नोंदवत देवाक काळजी या वेब सिरीजच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला. या वेब सिरीजची स्क्रीप्ट आपली आहे, असा दावा करत नवीगन्स स्टुडीओ प्रा.लि. यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कंपनीने जो कॉपीराईटचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि वेब सिरीजमध्ये जे दाखवण्यात आले आहे, ही महाराष्ट्रातील प्रथाच आहे. गणपतीला लोक गावी जातातच. त्यावर कोणाचाच कॉपीराईट असू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

‘घरात गणपती’ या चित्रपटाच्या कॉपीराईटचा मुद्दा कंपनीने उपस्थित केला होता. देवाक काळजी वेब सिरीजचे लेखक, दिग्दर्शक व अभिनेते समीर खांडेकर व अभिनेत्री दिब्यलक्ष्मी यांनी कॉपीराईटचा भंग केला आहे, असा आरोप कंपनीने केला होता. आमच्या चित्रपटाची थीम वेब सिरीजमध्ये कॉपी करण्यात आली आहे, असा दावा कंपनीचे वकील आशीष कामत यांनी न्यायालयात केला होता.

कॉपीराईटची शाहनिशा करण्यासाठी न्या. पितळे यांनी वेब सिरीजचे चार भाग बघितले. वेब सिरीजची कथा चित्रपटातून घेतलेली आहे, असे प्रथमदर्शनी तरी स्पष्ट होत नाही. वेब सिरीजच्या कथेची कागदपत्रेही निसंदेह आहेत, असे नमूद करत न्यायालयाने वेब सिरीजच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला. यावरील पुढील सुनावणी 25 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. 15 सप्टेंबरला यु-टय़ूबवर वेब सिरीज प्रदर्शित झाली.