6 वर्षावरील मुलांना कोवॅक्सिन देण्यास सरकारी समितीची परवानगी

6 ते 12 वयोगटातील मुलांना कोवॅक्सिन ही कोरोनावरील लस देण्याची औषधी महानियंत्रकांनी (Drugs Controller General of India) परवानगी दिली आहे. यामुळे 6 ते 12 या वयोगटातील मुलांचेही लवकरच लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. महानियंत्रकांनी मर्यादीत स्वरुपात लसीच्या अत्यावश्यक वापरास मंगळवारी परवानगी दिली. महानियंत्रकांच्या समितीने डिसेंबर 2021 मध्ये 12 वर्षांवरील मुलांना लस देण्यास परवानगी दिली होती.

6-12 या वयोगटातील मुलांना लस देण्यासाठीची परवानगी देताना महानियंत्रकांनी अट घातली आहे. या लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीला पहिले दोन महिने भल्या-बुऱ्या परिणामांची सगळी माहिती दर 15 दिवसांनी देण्यास सांगितले आहे. त्यानंतर पुढील पाच महिने ही माहिती दर महिन्याला द्यावी असेही सांगण्यात आले आहे.