धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे एकमेकांवर तोडपाणीचे आरोप

25

सामना ऑनलाईन, बीड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांमधील शाब्दीक युद्धामुळे बीडमधलं राजकीय वातावरण पेटलं आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर राजकीय स्वार्थासाठी तोडपाणी केल्याचा आरोप केला आहे. आपल्यावर केलेल्या आरोपांमुळे संतापलेल्या सुरेश धस यांनी आता मुंडे यांना कोर्टात खेचण्याची भाषा वापरायला सुरुवात केली आहे.

सुरेश धस यांनी हातावरचं घड्याळ काढत हातात कमळ धरण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत असं बोललं जातंय. धस यांचे विरोधक असलेल्या आणि भाजपचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब अजबे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्ता जाताच धस यांनी राष्ट्रवादीशी गद्दारी केली, असली गद्दार औलाद या मतदार संघात जन्मालाच कशी येते? असा सवाल विचारत शाब्दीक युद्धाला सुरुवात केली. त्यापाठोपाठ धनंजय मुंडे यांनी धस यांच्यावर आरोप केला की महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून त्यांनी १५ कोटी रुपये घेतले आहेत. १५ कोटींच्या बदल्यात धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच जिल्हा परिषद सदस्य भाजपाच्या दावणीला बांधले असा धनंजय मुंडे यांचा आरोप आहे.

धनंजय मुंडे यांच्या आरोपांनंतर धस यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. धनंजय यांच्या बंगल्यावर काय-काय चालतं ते मला माहिती आहे. मुंडे आता आपल्या वाक्यावर ठाम राहावे पळपुटेपणा करू नये आता यापुढे जे काही होईल ते कोर्टात होईल कारण मी त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे असं धस यांनी म्हटलंय.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करून जिल्हा परिषदेवर बहुमत नसताना भाजपचा अध्यक्ष केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी राज्यमंत्री सुरेश धस यांचे पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन केले होते. त्यामुळे धसांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या