इंधन दरवाढी विरोधात धनंजय मुंडे यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन

सामना प्रतिनिधी । परळी वैद्यनाथ

संपूर्ण देशभरात होत असलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर येऊन आंदोलन केले. हे आंदोलन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी चौक येथून पायी रॅली काढून इंधन दरवाढीचा तीव्र निषेध केला. ही रॅली राणी लक्ष्मीबाई टॉवरपर्यंत काढण्यात आली. मोदी सरकारच्या धोरणांचा चांगलाच समाचार यावेळी मुंडे यांनी घेतला. इंधनाची ही होत असलेली रेकॉर्ड दरवाढ हेच अच्छे दिन आहेत का, असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला. याआंदोलनावेळी रा.कॉ.युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, गटनेते वाल्मिक कराड, बाजीराव धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी,उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, भावड्या कराड, शरद मुंडे, लड्डा, राजेंद्र सोनी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.