पंकजा मुंडेवर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका, धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

30267

विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक चुरशीच्या लढतींपैकी एक म्हणजे परळी येथील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील लढत आहे. या ‘महाव्होल्टेज’ लढतीला प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गालबोट लागले. भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी भाजपने महिला आयोग आणि निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.

शनिवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी धनंजय मुंडे यांनी विडा येथे झालेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टिका केली होती. या गलिच्छ भाषेतील टिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे विरोधात मुंडे समर्थक, वंजारी समाज आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. महायुतीच्या परळी येथे झालेल्या समारोपाच्या सभेत या विषयावर आक्रमक पवित्रा घेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेवर कडाडून हल्ला चढवला.

सभा संपल्यानंतर पंकजा मुंडे यांना आली चक्कर

पंकजा मुंडे यांच्या विषयी गलिच्छ भाषा वापरणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त कार्यकर्ते शनिवारी रात्री पोलीस ठाण्यावर धडकले. भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे विरूध्द कलम 500, 509, 294 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हजारो महिलांचा जमाव यश:श्री निवासस्थानी जमा झाला. परळीसह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली असून ठिकठिकाणी धनंजय मुंडे यांचा निषेध केला जात आहे. महिला वर्गाच्या भावना तीव्र झाल्या असून सख्ख्या बहिणीबद्दल गलिच्छ वक्तव्य करणारे धनंजय मुंडे सामान्य महिलांचा काय सन्मान करणार असा सवाल महिला करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या