धारावी पोलिसांचा सुखद धक्का हरवलेले, चोरीला गेलेले 163 मोबाईल नागरिकांना केले परत

मोबाईल हा माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईलशिवाय हल्ली लोकांचे पान हलत नाही. पण तोच मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला की मोठीच समस्या निर्माण होते. शिवाय हरवेला मोबाईल परत मिळेल याची सूतराम शक्यता नसते. त्यामुळे मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला की विसरा अशी लोकभावना असते. परंतु धारावी पोलिसांनी अशा मोबाईलधारकांना सुखद धक्का दिला आहे.

शहरात दररोज मोबाईल हरवल्याच्या किंवा चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. मोबाईल परत मिळेल याची काही शाश्वती नसते. त्यामुळे तक्रार दिल्यानंतर मिळाला तर मिळाला असे लोकांचे म्हणणे असते. पण धारावी पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आणि पोलीस ठाण्यात गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत त्या मोबाईलचा शोध घेण्यास सुरुवात केली. वरिष्ठ निरीक्षक विजय कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली चव्हाण व त्यांच्या पथकाने तांत्रिक बाबी व मानवी कौशल्याच्या आधारे गहाळ झालेले तब्बल 163 मोबाईल शोधून काढले. ते मोबाईल मंगळवारी उपायुक्त मनोज पाटील यांच्या हस्ते संबंधित मोबाईलधारकांना परत देण्यात आले. त्या मोबाईलधारकांनी हरवलेला मोबाईल मिळेल अशी आशाच सोडली होती; परंतु धारावी पोलिसांनी चांगली कामगिरी करत त्या मोबाईलधारकांना सरप्राईज दिले.