धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना व्याजासह रक्कम देणार, पण…

24

सामना ऑनलाईन । नागपूर

धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले असून याप्रकरणी त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करू असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका मांडली. धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना जमीनीचा मोबदल्याची रक्कम व्याजासह दिली जाईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. मात्र मंगळवारी जिल्ह्याधिकाऱ्यांकडून या प्रकरणासंदर्भात अहवाल सादर केला जाणार आहे. तो तपासून ही रक्कम देण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

हे प्रकरण २००९ ते २०१५ या काळातील आहे. त्यामुळे याची माहिती आम्ही मागवली आहे. या प्रकल्पासाठी घेतलेल्या जमीनीच्या मोबदल्यातील तफावत म्हणून केवळ धर्मा पाटील नाही तर अन्य शेतकऱ्यांनी देखील तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे या १९९ हेक्टर जमीनीचे फेर मुल्ल्यांकन केले जाईल, असे बावनकुळे म्हणाले. तसेच जिल्हाधिकारी यासंदर्भात मंगळवारी अहवाल सादर करणार आहेत, त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊन पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असेही ते म्हणाले. कोणावरही अन्याय होता कामा नये ही सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील विखरण या गावचे रहिवासी असलेले वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांची सगळी शेतजमीन सरकारच्या औष्णिक प्रकल्पात गेली. त्यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची ६०० झाडे, विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती होती. मात्र सरकारने केवळ चार लाखांचा मोबदला दिला. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी भरपाई मिळाल्यामुळे पाटील यांनी धुळे जिल्हा प्रशासनातील प्रमुख कार्यालये व मंत्रालयात अनेक खेटे घातले. न्याय मिळत नसल्याने निराश झालेल्या धर्मा पाटील यांनी मंत्रालयात २२ जानेवारीला विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी रात्री त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या