धोनीला सूर गवसला, पुण्याचा हैदराबादवर ६ गडी राखून विजय

38

सामना ऑनलाईन । पुणे

धोनीच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट संघानं सनरायझर्स हैदराबादचा ६ गडी राखून पराभव केला आहे. आयपीएलच्या या सत्रात पहिल्यांदाच धोनीचं वादळ मैदानावर घोंगावलं. या वादळापुढे हैदराबादचे गोलंदाज हतबल झाल्याचं दिसून आलं. धोनीनं शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत पुण्याला विजय मिळवून दिला.

पुण्याकडून धोनीनं ३४ चेंडूत ५ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार ठोकत शेवटपर्यंत नाबाद राहात ६१ धावा केल्या. पुण्याचा सलामीवीर आर. त्रिपाठीनं ४१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५९ धावा केल्या. त्रिपाठीला रशिद खाननं रन आऊट केलं. हैदराबादकडून भूवनेश्वर कुमार, बिपूल शर्मा आणि रशिद खाननं प्रत्येकी एक बळी मिळवला.

तत्पूर्वी हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद १७६ धावा केल्या. हैदराबादकडून हेनरीकसनं २८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५५ धावा, तर हुड्डानं शेवटच्या षटकांत १० चेंडूचा सामना करत २ चौकार आणि १ षटकार ठोकत नाबाद १९ धावा केल्या. त्याआधी हैदराबादचा कर्णधार डेव्हीड वॉर्नरनं ४० चेंडूत ४३ धावा केल्या. पुण्याकडून उनादकत, ख्रिस्तियन आणि ताहीरनं प्रत्येकी एक बळी मिळवला.

आपली प्रतिक्रिया द्या