एकच हृदय किती वेळा जिंकशील रे..! धोनी मेंटॉर म्हणून रुपयाही घेणार नाही, BCCI ची माहिती

आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी हिंदुस्थानचा माजी खेळाडू महेंद्रसिंह धोनी याची मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून निवड झाली आहे. मात्र या कामासाठी धोनी एक रुपयाही घेणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबत माहिती दिली.

महेंद्रसिंह धोनी हा आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीच्या संघाचा मेंटॉर म्हणून काम पाहणार आहे. या कामासाठी धोनी कोणतेही मानधन घेणार नाहीय, असे जय शहा यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितले.

तत्पूर्वी दुबई-ओमानमध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी गेल्या महिन्यात बीसीसीआयने हिंदुस्थानच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. या घोषणेसह बीसीसीआयने चाहत्यांना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला. बीसीसीआयने ‘कॅप्टन कूल’ आणि विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची टी-20 विश्वचषकासाठी हिंदुस्थानी संघाचा मेंटॉर म्हणून निवड केली.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी महेंद्रसिंह धोनी हा टी-20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघाचा मेंटॉर असेल अशी माहिती दिली. यानंतर सोशल मीडियावर धोनीच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

दरम्यान, वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानचा संघ आपले अभियान 24 ऑक्टोबरपासून सुरू करणार आहे. हिंदुस्थानचा संघ ग्रुप-2 आहे. ग्रुप स्टेजला विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया 5 लढती खेळेल. हिंदुस्थानचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानशी, दुसरा सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध, तिसरा सामना 3 नोव्हेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध, चौथा सामना 5 नोव्हेंबरला ग्रुप बीच्या विजेत्या टीमसोबत आणि पाचवा सामना 8 नोव्हेंबरला ग्रुप ए च्या उपविजेत्या टीमसोबत होईल.

आपली प्रतिक्रिया द्या