राज्यातली कायदा सुव्यवस्था धुळीस मिळाली, जितेंद्र आव्हाड यांची टीका

गोमांस घेऊन जाण्याच्या संशयावरून काही तरुणांनी एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती. पण त्यांना तत्काळ जामीन मंजूर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातली कायदा सुव्यवस्था धुळीस मिळाला आहे, पोलिसांचा धाकच उरला नाही असे आव्हाड म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मा. सर्वोच्च न्यालयाच्या निर्णयाचे कुठल्याही प्रकारे पालन न करता रेल्वे पोलिसांनी अतिशय सौम्य कलम लावली आणि गुन्हेगारांना मदत करण्याचा प्रयत्न केला. हा गुन्हा इतका गंभीर असून देखील त्याच्या गांभीर्याकडे आणि त्याच्या उमटलेल्या पडसादाची जाणीव ठेवली नाही असे आव्हाड म्हणाले.

त्या वृद्ध इसमाची दृष्टी कमी झाली. त्याला लघवीला होत नाही त्याच्या खिशातील २ हजार ८०० रुपये लुटले गेले. त्याला खुनाची धमकी देण्यात आली, हे सगळं होत असताना त्याची नोंद न करिता कोणती तरी सौम्य कलमे लावून आता त्या गुंडांचा जामीनही झाला आहे. पोलिसांवर लोकांचा विश्वास कसा राहील आणि यामुळेच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था धुळीस मिळते, कारण पोलिसांचा धाकच उरलेला नाही. असं जर होत असेल तर जनता रस्त्यावर उतरली तर लोकांची चूक काय ? जर रस्त्यावर उतरले तरी तुम्ही गुन्हा नोंदवणार लोकांवर असे आव्हाड म्हणाले.

तसेच आजची घटना महाराष्ट्राच्या इतिहासात न घडलेली घटना आहे इतकी विकृत घटना असतानादेखील जर पोलीस त्याचे गांभीर्य ओळखत नसतील तर हे महाराष्ट्राचे दूर्दैव आहे. दिवसें दिवस कायदा आणि सुव्यवस्था धुळीस मिळवण्यास पोलीस कारणीभूत ठरत आहेत. असे म्हणताना 126 (1), 127 (1), 118(1), 309(6), 189 (4), 189(3), 191(1), 191(2),191(3) BNS पोलिसांनी ही कलम लावायला हवी होती असेही आव्हाडांनी म्हटले आहे.