मुंबईतील हिरेव्यापार सुरतला पळवून नेणाऱ्या मोदी सरकारला जोरदार धक्का बसला आहे. गुजरातमध्ये सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले. परंतु गेल्या दोन वर्षांत हिऱ्याच्या किमती 35 ते 40 टक्क्यांनी घसरल्या असून यात तयार हिऱ्यांची किंमत 3 वर्षांत 35 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे गुजरातमधील हिरे व्यापार आर्थिक संकटात सापडला असून तब्बल 15 लाखांहून अधिक रोजगार बुडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एकेकाळी 1 लाख किमतीच्या हिऱ्याची किंमत घटून 65 ते 70 हजार झाली आहे. कच्च्या हिऱ्यांच्या किमती 25 टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत, ज्यामुळे व्यापाऱ्यांना 109 टक्क्यांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या 50 वर्षांत असे पहिल्यांदाच घडले असून हिरे व्यवसायात सलग दोन वर्षे मंदी आल्याचे चित्र आहे.
या मंदीमुळे जी-7 देशांनी रशियन हिऱ्यांवर बंदी घातली होती तसेच चिनी लोकांनी हिऱ्यांऐवजी सोने दागिन्यांची खरेदी सुरू केली. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून हिरे व्यापार गुजरातला पळवून नेण्याच्या मोदी सरकारच्या वृत्तीमुळे व्यापाऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असल्याची चर्चा आहे.
ग्राहक आता हिऱ्यांमध्ये गुंतवणूक करायला घाबरतात. त्यामुळे सोन्याला चांगले दिवस आलेत. बनावट हिरे देऊन फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक केलेली बरे असा विचार ग्राहक करत आहेत, असे इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ता कुमार जैन यांनी सांगितले.