महिला व पैशांच्या वादातून हिरे व्यापाऱ्याची हत्या, दोघांना अटक

सामना प्रतिनिधी । मुंबई

घाटकोपर पंतनगर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांची हत्या महिला आणि पैशांच्या वादातूनच झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी सचिन पवार आणि दिनेश पवार या दोघांना शनिवारी अटक केली. सचिन हा भाजपचा माजी पदाधिकारी आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सहाय्यक असून दिनेश हा निलंबित पोलीस कॉन्स्टेबल आहे. पोलिसांनी याप्रकरणी ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील ‘गोपी बहू’ अर्थात अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य हिचीही कसून चौकशी केली. या हत्येप्रकरणी काही बारबाला पोलिसांच्या रडारवर असून आतापर्यंत 100हून अधिक बारबालांची चौकशी करण्यात आल्याचे अपर पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी सांगितले.

28 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर
घाटकोपरच्या कामा लेनवरील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राजेश्वर उदानी हे कुटुंबीयांसोबत राहत होते. 28 नोव्हेंबर रोजी ते नेहमीप्रमाणे कामानिमित्त घराबाहेर पडले, पण त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा रोनक याने पंतनगर पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार 3 डिसेंबर रोजी पोलिसांनी घाटकोपर पूर्वेकडील विक्रोळी ट्रफिक चौकीसमोरील कॉर्नरवरून राजेश्वर यांचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याप्रकरणी भादंवि कलम 365अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. अखेर 7 डिसेंबर रोजी पनवेलमध्ये सडलेल्या अवस्थेत उदानी यांचा मृतदेह सापडला होता.

उदानी यांचे कॉल डिटेल्स तसेच काही तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करीत असताना सचिन पवार आणि दिनेश पवार या दोघांची नावे समोर आली होती. त्यामुळे पंतनगर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन शनिवारी दिवसभर कसून चौकशी केली तेव्हा उदानी यांची हत्या करण्यात आपला हात असल्याचे सचिन व दिनेशने कबूल केले. त्यामुळे भादंवि कलम 365, 302, 120ब, 201 अन्वये गुन्हा दाखल करून सचिन आणि दिनेशला अटक केल्याचे सांगितले.

गोपी बहू अडचणीत
अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य हिचीदेखील पोलिसांनी चौकशी केली. देवोलिना ही राजेश्वर आणि सचिन या दोघांची मैत्रीण होती. तिच्यावरूनच दोघांमध्ये वाद झाला असावा असा पोलिसांना संशय आहे. अद्याप तिच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही; मात्र या प्रकरणात देवोलिना हिचाही सहभाग दिसून येत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. तर सचिन व दिनेशव्यतिरिक्त आणखी काहींना अटक होईल असे पोलिसांनी सांगितले. त्यात देवोलिना आणि आणखी काही महिलांचा समावेश असू शकतो असे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या