मस्तवाल सत्ताधाऱ्यांना एका बोटाने हरवू शकतो, त्यांचा वारू रोखू शकतो हे देशातील सर्वसामान्य जनतेने जगाला दाखवून दिले, त्यांचा मला अभिमान आहे, असे सांगतानाच, आजच्या निकालानंतर उंबरठय़ावर असलेल्या हुकूमशहांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. पेंद्रात सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडीने दावा करायलाच पाहिजे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला भरभरून मते दिली. राज्यात शिवसेनेचे 9 शिलेदार निवडून आले. या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते हे दाखवून दिल्याबद्दल देशातील नागरिकांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या इंडिया आघाडीची दिल्ली येथे बैठक होणार असून आपण त्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्या बैठकीला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाईही उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान पदाचा नेता बैठकीत ठरणार
इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, इंडिया आघाडीची स्थापना केली गेली तेव्हा आमच्यापैकी कुणीही पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे अशा मताचा कुणी नव्हता. देशातील लोकशाही वाचवली पाहिजे, संविधान वाचवले पाहिजे आणि हुकूमशाहीपासून देशाला वाचवले पाहिजे अशी सर्वांची भावना होती. ती आजही कायम आहे. उद्याच्या बैठकीत सर्वानुमते पंतप्रधान पदाचा नेता ठरवला जाईल. व्यक्तीला नाही तर हुकूमशाही प्रवृत्तीला संपवले पाहिजे. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवले पाहिजे, असे आम्ही त्याच वेळी ठरवले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
निकालानंतर इंडिया आघाडीकडून छोटय़ा पक्षांशी संपर्क सुरू आहे. मोदी सरकारच्या जुलूम-जबरदस्तीला चिडलेले पक्ष, अपक्ष आघाडीत एकवटतील आणि पुन्हा हुकूमशाहीचे सरकार येणार नाही याची खात्री देतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
भाजपकडून नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्याशी संपर्क साधला गेला. इंडिया आघाडीनेही त्यांना संपर्क केला आहे का, असे पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारले. त्यावर नितीश कुमार यांच्याशी कॉंग्रेसकडून बोलणी सुरू आहेत, असे ते म्हणाले. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना भाजपने कमी त्रास दिला नव्हता, तो त्रास त्यांना पुन्हा हवा आहे का हा प्रश्न आहे, असे ते पुढे म्हणाले. भाजपच्या सुडाच्या राजकारणाला, जीवघेण्या त्रासाला जे जे पंटाळलेले आहेत ते सर्व लोक इंडिया आघाडीत येतील, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अनिल देसाई, उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित होते.
दंडेलशाहीसाठी चंद्राबाबू मोदींना पाठिंबा देणार का?
भाजपने चंद्राबाबू नायडू यांना संपर्क साधल्याच्या मुद्दय़ावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पुन्हा बोलणी का करताय चंद्राबाबूंशी, पुन्हा छळा ना. शिवसेनाही भाजपसोबत होती. तरीसुद्धा त्यांनी शिवसेनेच्या लोकांमागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय लावली. शिवसेनेतून गद्दार पह्डून त्यांना उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारासाठी मोदी स्वतः आले. तोच अनुभव चंद्राबाबू पुन्हा घेतील असे वाटतेय का? ज्यांच्यावर धाडी टाकल्या, दंडेलशाही झाली, यंत्रणांचा दुरुपयोग केला गेला तोच प्रकार पुन्हा करण्यासाठी चंद्राबाबू मोदींना पाठिंबा देणार का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत, त्यांनी देशातील जनतेचे धन्यवाद व्यक्त केले आहेत, असे ट्विट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्याची उद्धव ठाकरे यांनी खिल्लीच उडवली. मोदी सामान्य असतील तर आपण म्हटले असते की देव त्यांचे भले करो. पण त्यांनी स्वतःलाच देव म्हटल्यावर मग कोण त्यांचे भले करो म्हणणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेला 48 जागांची अपेक्षा होती
महाराष्ट्रातील निकालाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सर्व 48 जागा मिळतील अशी अपेक्षा होती असे सांगितले. उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात झालेल्या गडबड घोटाळ्यामुळे शिवसेना त्या निवडणुकीलाच आव्हान देण्याच्या तयारीत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
कोकणचा पराभव क्लेषकारक
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा झालेला पराभव अनाकलनीय आणि क्लेषकारक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कोकण शिवसेनेपासून कुणी तोडू शकत नाही. कोकणी माणूस असा दगा देऊ शकत नाही. तिथे लोकांनी शिवसेनेविरोधात मतदान केले असेल असे वाटत नाही, असे सांगताना, कोकणात नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे, अशी शक्यताही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
सांगलीत आघाडीचा धर्म पाळला गेला की नाही…
सांगली मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत होऊन अपक्ष उमेदवार विशाल पाटील निवडून आले. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी आघाडी धर्माचा दाखला दिला. सांगलीत आघाडीचा धर्म पाळला गेला की नाही हे बघावे लागेल, असे ते म्हणाले.
आता असली शिवसेना कळेल
शिवसेनेच्या मशालीने आग लावलीच आहे. 2019 मध्ये किती जागा होत्या. आता तर महायुती झाली आहे. त्या वेळी 41-42 जागा होत्या. आता किती झाल्या, असा सवाल करतानाच, आता असली-नकली शिवसेना कळेल, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहा आणि भाजपला लगावला. मला नकली संतान म्हणणारे मोदी त्यांना परमात्म्याने पाठवलेय असे सांगतात, म्हणजेच ते त्यांच्या आईलाही मानायला तयार नाहीत, मग नकली संतान कोण, असाही चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.