पंतप्रधान मोदी त्यांच्या पत्नीसह अयोध्येला गेले होते का ? आंध्र प्रदेशच्या मंत्र्याचा भाजप नेत्यांना प्रश्न

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी नुकताच तिरुमलाचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी सपत्नीक जाण्याऐवजी एकट्याने भगवान वेंकटेश्वर मंदिरात पवित्र वस्त्रे अर्पण केली. या दौऱ्यावर भाजपने टीका करत जगनमोहन रेड्डी यांनी त्यांच्या पत्नीला सोबत का नेले नाही असा प्रश्न विचारला होता. जगनमोहन यांच्या मंत्रिमंडळातील अन्न पुरवठा विभागाचे मंत्री कोडाली हे भाजपच्या या प्रश्नामुळे भडकले असून त्यांनी टीकाकार भाजप नेत्यांना उलटा प्रश्न विचारला आहे की अयोध्येतील भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी त्यांच्या पत्नीला सोबत का नेले नाही ?

आंध्र प्रदेशात सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांत शाब्दीक संघर्ष वाढल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी या संघर्षाचा पुढचा अंक पाहायला मिळाला. कोडाली यांनी पंतप्रधानांव्यतिरिक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही नाव घेत भाजपच्या नेत्यांना प्रश्न विचारला. आदित्यनाथ यांनी त्यांच्या कुटुंबाला भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला का नेले नाही असा प्रश्न कोडाली यांनी विचारला. भाजपच्या नेत्यांनी कोडाली यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती. याबाबत कोडाली यांना विचारलं असता ते म्हणाले की जगन मोहन यांनी मला मंत्रिमंडळातून का काढावे ? विरोधकांनी मागणी केली तर केंद्रीय मंत्रिमंडळातून अमित शहा यांची हकालपट्टी होईल का ? असे प्रश्न कोडाली यांनी विचारलेत.

कोडाली हे जगनमोहन रेड्डी यांच्यासोबत तिरुमला इथे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आले आहेत. गरुड वाहन सेवेच्या निमित्तानेभगवान वेंकटेश्वराला पवित्र वस्त्रे अर्पण केली जातात. यासाठी रेड्डी यांनी हा दौरा आयोजित केला होता. भाजपकडून या दौऱ्यावरून रेड्डी यांना लक्ष्य करण्यात आले होते. हिंदू देवीदेवतांचा अचानक पुळका आल्याचा सत्ताधाऱ्यांवर भाजपने आरोप केला होता. रेड्डी जाणार असतील तर त्यांनी त्यांच्या पत्नीलाही सोबत न्यावे अशी मागणी भाजपने केली होती. यावरून कोडाली यांनी भाजप नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याऐवजी पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांचे कुटुंबीय अयोध्येच्या भूमीपूजनासाठी का नेले नाही असा प्रश्न विचारावा असा सल्ला दिला आहे.2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला नोटापेक्षा कमी मते मिळाली होती. याची आठवण करून देत कोडाली यांनी भाजप नेत्यांनी आपल्या पक्षात अधिक लक्ष घालावे जेणेकरून त्यांना अधिक मते मिळतील असे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या