डिझेल इंजिन सुरू करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या ३ शेतकऱ्यांचा मृत्यू

46

सामना प्रतिनिधी । जालना

वीज नसल्याने कपाशीला पाणी देण्यासाठी डिझेल इंजिन सुरू करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तीन शेतकऱ्यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. बाबासाहेब वाबळे (५०), त्यांचा मुलगा रामेश्वर वाबळे (२७) आणि अर्जुन धांडे अशी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. महावितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळेच तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीय आणि नागरिकांनी केला आहे.

दैठणा परिसरात गेल्या आठ दिवसापासून वीजेचा लपंडाव सुरू असल्याने डिझेल इंजिनद्वारे पाण्याचा उपसा करण्यासाठी बाबासाहेब वाबळे व त्यांचा मुलगा रामेश्वर बाबासाहेब वाबळे हे दोघे दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरले होते. इंजिन सुरू करताच अचानक धुराचे लोट उठल्यामुळे या दोघांचा श्वास गुदमरला. विहिरीबाहेर उभे असलेल्या अर्जुन साहेबराव धांडे, आसाराम वाबळे व परमेश्वर वाबळे यांनी खाली उतरून दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यांचाही श्वास गुदमरल्याने स्थानिक ग्रामस्थांनी कडे करून सर्वांना बाहेर काढले. तोपर्यंत बाबासाहेब वाबळे, त्यांचा मुलगा रामेश्वर वाबळे व अर्जुन धांडे मयत झाले होते. तर बाबासाहेब वाबळे यांचे बंधू आसाराम वाबळे, मुलगा परमेश्वर वाबळे यांचा श्वास गुदमरल्याने बेशुध्द झाले होते. या सर्वांना ग्रामस्थांनी जालना येथे खाजगी रूग्णालयात दाखल केले.

आणखी किती शेतकऱ्यांचा बळी घेणार- राज्यमंत्री खोतकर
वीज मंडळ आणखी किती शेतकऱ्यांचा बळी घेणार आहे, वीज मंडळ शेतकऱ्यांची किती पिळवणुक करणार आहे, असा संतप्त सवाल राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केला. या सबंधी राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्याची भेट घेणार असल्याचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले आहे.

ऊर्जामंत्री आल्या शिवाय अंत्यसंस्कार करणार नाही
महावितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थ प्रचंड संतापले असून या घटनेस वीज मंडळाच जबाबदार असून ऊर्जामंत्री आल्याशिवाय मयत शेतकऱ्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या