नगर- बेकायदेशीरपणे डिझेल भरताना दोन टँकर पकडले; एकाला अटक

नगर शहरात बेकायदेशीर डिझेल भरणारे दोन टँकर पकडले असून, एकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 13 लाख 45 हजार 275 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गौतम वसंत बेळगे (रा. भगवानबाबा चौक, भिंगार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने जीपीओ चौकाजवळ ही कारवाई केली.

अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी शहरातील अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली आहे. बेकायदेशीर गुटखा-दारू विक्री, मटका-जुगार अड्डय़ांवर कारवाईनंतर आता बेकायदेशीर डिझेलवर कारवाई केली आहे. 26 ऑक्टोबर रोजी जीपीओ चौकाजवळील छावणी कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूला सुलभ शौचालयासमोर गौतम बेळगे हा या टँकरमध्ये डिझेल भरताना व बेकायदेशीरपणे साठा बाळगताना आढळून आला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील तपास करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी, हेडकॉन्स्टेबल गणेश डहाळे, भरत डंगोरे, नाईक संदीप धामणे, राजू चव्हाण, अरविंद भिंगारदिवे, अजित घुले, विनोद पवार या विशेष पथकाने ही कारवाई केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या